रोहित शर्माचे स्थान कायम : अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
By admin | Published: September 13, 2016 04:52 AM2016-09-13T04:52:26+5:302016-09-13T04:52:26+5:30
कामगिरीत सातत्य राखण्यात नेहमी अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्मावर निवडकर्त्यांनी आपला विश्वास कायम ठेवत त्याची संघात निवड केली आहे.
मुंबई : आगामी २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी मुंबई भारतीय संघ निवडण्यात आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कामगिरीत सातत्य राखण्यात नेहमी अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्मावर निवडकर्त्यांनी आपला विश्वास कायम ठेवत त्याची संघात निवड केली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सलग चार अर्धशतके झळकावून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरऐवजी रोहितला मिळालेली पसंती सर्वाधिक चर्चेची बाब ठरली.
निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेला संघच कायम ठेवताना सदस्यांची संख्या दोनने कमी करून १५ खेळाडूंवर आणली. यामध्ये युवा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी यांना संघाबाहेर बसविण्यात आले आहे. विद्यमान राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघनिवडीबाबत सांगितले, ‘‘चांगली कामगिरी करणारा संघ कायम राखण्यावर आम्ही भर दिला. आमच्या मते निवडलेला संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी सर्वोत्तम आहे. या मालिकेच्या संघनिवडीसाठी आम्ही कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशीही चर्चा केली. त्यामुळेच आम्ही परदेश दौऱ्यात चांगली कामगिरी केलेल्या संघावरच भरवसा ठेवला आहे.’’
दरम्यान, या वेळी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो रोहित शर्माची संघात झालेली निवड. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा जागतिक विक्रम रचणाऱ्या रोहितने भारतासाठी आतापर्यंत केवळ १८ कसोटी सामने खेळले आहेत. नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना पहिल्या दोन कसोटीत दोन शतकी खेळी करताना रोहितने जबरदस्त खेळ केला. मात्र, यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आल्याने तो कायम टीकेचा धनी ठरला. एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या रोहितला कसोटीत मात्र लौकिकास साजेशी कामगिरी करता न आल्याने त्याची निवड अनपेक्षित ठरली.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यातही रोहितला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. यापैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला, तर एका सामन्यात त्याला अनुक्रमे ९ व ४१ धावा काढता आल्या. शिवाय दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही रोहित विशेष कामगिरी न करता केवळ ३० धावांवर परतला. दुसरीकडे, दुलीप ट्रॉफीमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणारा अनुभवी फलंदाज गौतम गंभीरकडे मात्र दुर्लक्ष झाल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगत आहे. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात रोहितचा अध्यक्षीय संघात समावेश असल्याने मालिकेसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे असेल.
दरम्यान, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात सहा प्रमुख फलंदाज असून वृद्धिमान साहावर यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. सलामीवीर म्हणून शिखर धवन - मुरली विजय ही जोडी जवळजवळ निश्चित आहे. तर, मधल्या फळीची जबाबदारी कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा यांच्यावर असेल.
अखेरची संघ निवड...
संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीची ही अखेरची निवड ठरली. सप्टेंबर २०१२ मध्ये मोहिंदर अमरनाथ यांना पदावरून दूर केल्यानंतर संदीप पाटील यांच्याकडे निवड समितीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या वेळी त्यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना सांगितले, ‘‘मी माझ्या व सहकाऱ्यांच्या कामगिरीवर खूश आहे. बीसीसीआयकडून मिळालेल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल मी आभारी आहे.
माझ्या कार्यकाळाच्या शेवटी एका गोष्टीचे खूप समाधान आहे, की आज भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करीत असून भविष्यातही हा आलेख असाच उंचावत जाईल, अशी अपेक्षा करतो.’’ त्याचप्रमाणे, ‘‘माझ्या कार्यकाळात बीसीसीआयने काही शानदार निर्णय घेतले. राहुल द्रविडकडे ज्युनियर व अनिल कुंबळेकडे सीनियर संघाची धुरा देताना बीसीसीआयने जी काही व्यूहरचना आखली आहे त्यावर आम्ही आनंदी आहोत,’’ असेही पाटील यांनी सांगितले.
आमच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही बीसीसीआय अधिकाऱ्याने कोणत्याही शिफारशीबाबत निवड समितीशी संपर्क केला नसल्याचेही पाटील यांनी या वेळी सांगितले.
आम्ही सीनियर्सना विसरलेलो नाही...
अनुभवी फलंदाज गौतमच्या निवडीबाबत ‘गंभीर’ प्रश्न विचारण्यात आल्यानंतर संदीप पाटील म्हणाले, ‘‘आम्ही केवळ गौतमच नाही, तर प्रत्येक सीनियर खेळाडूंचा विचार केला. आम्ही सीनियर खेळाडूंना विसरलेलो नाही. या मालिकेसाठी आम्ही केवळ १५ खेळाडू निवडले असून मला आनंद आहे, की आपल्याकडे सुमारे ३० खेळाडूंचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध आहे.’’
‘हिट मॅन’चे समर्थन...
निवडकर्ते, प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या मते रोहित शर्मा शानदार खेळाडू असून त्याला संधी देणे गरजेचे आहे. रोहितला क्रिकेटच्या पारंपरिक प्रकारामध्ये सातत्याने संधी मिळालेली नाही. नेहमी त्याला एक सामना खेळविल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या सामन्यात बाहेर बसविण्यात आले आहे. त्यामुळे त्याला संधी मिळणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक निवडलेल्या खेळाडूला अधिक संधी मिळावी, असा प्रयत्न आहे, अशा शब्दांत संदीप पाटील यांनी रोहितच्या निवडीचे समर्थन केले.
निवडलेला भारतीय कसोटी संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, अमित मिश्रा आणि उमेश यादव.