रोहित मालिका खेळणार नाही
By admin | Published: November 3, 2016 04:30 AM2016-11-03T04:30:23+5:302016-11-03T04:30:23+5:30
रोहित शर्मावर पुन्हा एकदा दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब राहण्याची वेळ आली आहे.
मुंबई : आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकवेळा दुखापतीचा सामना करणारा आक्रमक फलंदाज रोहित शर्मावर पुन्हा एकदा दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब राहण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत मांडीला झालेल्या दुखापतीमुळे रोहित आगामी ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, त्याच्यावर शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता असून, यातून सावरण्यास त्याला किमान ६-८ आठवड्यांच्या कालावधी लागेल.
विशाखापट्टणम येथे २९ आॅक्टोबरला झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या उजव्या मांडीला दुखापत झाली. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हा आक्रमक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी संघाबाहेर गेला आहे.
संघनिवडीनंतर प्रसाद यांनी सांगितले की, ‘आपण सर्वांनीच पाहिले आहे की, रोहितला खूप मोठी दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. शिवाय, कदाचित यासाठी त्याला इंग्लंडलाही जावे लागेल. निश्चितच यामुळे आम्ही कसोटी मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार करणार नाही. जर शस्त्रक्रिया जरुरी नसेल, तर सावरण्यासाठी त्याला किमान ६-८ आठवड्यांचा कालावधी लागेल. परंतु, जर शस्त्रक्रिया झाली तर याहून अधिक कालावधी लागेल.’
दरम्यान, आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागल्याने रोहितला मोठा फटका बसला आहे. नागपूर येथे २०१० मध्ये आॅस्टे्रलियाविरुद्ध कसोटी पदार्पणासाठी सज्ज असतानाच संघसहाकाऱ्यांसह फुटबॉल खेळताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे, या सामन्याच्या नाणेफेकीला अवघा अर्धा तास शिल्लक असतानाच रोहितला ही दुखापत झाली होती.
यानंतर त्याच्या जागी वृद्धिमान साहाने फलंदाज म्हणून पदार्पण
केले होते. तर, रोहितला
कसोटी पदार्पणासाठी यानंतर २०१३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या
मालिकेची प्रतीक्षा करावी
लागली होती. (क्रीडा प्रतिनिधी)