रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

By admin | Published: January 19, 2015 03:22 AM2015-01-19T03:22:26+5:302015-01-19T03:22:26+5:30

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला

Rohit's century was useless, India lost | रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

Next

मेलबोर्न : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय मिळवीत अंतिम फेरीच्या दिशेने आश्वासक आगेकूच केली. भारताच्या रोहित शर्माची (१३८) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.
भारताने दिलेल्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने फिंचच्या (९६ धावा, १२७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९ षटकांत विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्याआधी, मिशेल स्टार्कच्या (४३ धावांत ६ बळी) आॅस्ट्रेलियाने भारताचा डाव ८ बाद २६७ धावांत रोखला. भारताच्या डावात शतकवीर रोहित शर्मासह सुरेश रैनाचे (५१) योगदान उल्लेखनीय ठरले.
फिंचच्या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला प्रतिकूल परिस्थिीतही लक्ष्य गाठण्यात यश आले. फिंचने डेव्हिड वॉर्नरसह (२४) सलामीला ५१ धावांची, शेन वॉटसनसोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची, कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४७) तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. भारताने अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियावर दडपण निर्माण केले; पण अखेर यजमान संघ विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेत सलामी लढतीत इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला होता. भारताला आता दुसऱ्या लढतीत २० जानेवारी रोजी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच व वॉर्नर यांनी आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी नवव्या षटकात आॅस्ट्रेलियाला धावसंख्येचे अर्धशतक गाठून दिले. यादवने वॉर्नरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन वैयक्तिक २८ धावांवर असताना सुदैवी ठरला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्धचे पायचितचे अपील पंचानी फेटाळले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वॉटसनला (४१ धावा, ३९ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) पटेलने तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर अश्विनने कर्णधार जॉर्ज बेली (५), तर भुवनेश्वरने ग्लेन मॅक्सवेलला (२०) बाद करीत यजमान संघावर दडपण निर्माण केले. ब्रॅड हॅडिन (नाबाद १३) व जेम्स फॉकनर (नाबाद ९) यांनी आॅस्ट्रेलियाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितचे काराकिर्दीतील सहावे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिसरे शतक आहे. रोहित व रैना यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करीत डाव सावरला. कर्णधार धोनी (१९) बाद झाला. अखेरच्या १० षटकांत भारताने ४ विकेटचे मोल देत केवळ ६१ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Rohit's century was useless, India lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.