रोहितचा ‘सलामी’ तडाखा
By admin | Published: February 25, 2016 03:56 AM2016-02-25T03:56:09+5:302016-02-25T03:56:09+5:30
रोहित शर्माच्या (८३ धावा, ५५ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) आक्रमक फलंदाजीला आशिष नेहराच्या सुरेख गोलंदाजीची (२३ धावांत ३ बळी) साथ मिळाल्याने भारताने बांगलादेशला
मिरपूर : रोहित शर्माच्या (८३ धावा, ५५ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) आक्रमक फलंदाजीला आशिष नेहराच्या सुरेख गोलंदाजीची (२३ धावांत ३ बळी) साथ मिळाल्याने भारताने बांगलादेशला त्यांच्याच मैदानावर ४५ धावांनी मात देत विजयी सलामी दिली.
मिरपूरच्या शेरे बांगला मैदानावर आशिया कप टी-२० स्पर्धेतील पहिली लढत झाली. भारताने विजयासाठी दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २० षटकांत ७ बाद
१२१ धावांत आटोपला. सलामीचा फलंदाज मोहम्मद मिथूनला (१) आशिष नेहराने त्रिफळाचीत करीत तंबुत पाठवित बांगलादेशला पहिला झटका दिला. पाठोपाठ जसप्रित बुमराहने महेंद्रसिंह
धोणी याच्या करवी सलामीवीर
फलंदाज सौम्या सरकारला बाद
करीत बांगलादेशची अवस्था १ बाद ९
वरुन २ बाद १५ धावा अशी केली.
त्यानंतर आलेल्या शब्बिर रेहमानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्याने ३२ चेंडूत २ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ४४ धावांची खेळी करीत एकाकी लढत दिली.
इमरुल कायेस (१४), साकिब अल हसन (३) पाठोपाठ बाद झाले. शब्बीर रहमानचा अडथळा हार्दिक पांड्याने दूर करीत बांगलादेशला पाचवा झटका दिला. त्यावेळी बांगलादेशची स्थिती ५ बाद ८२ अशी बिकट झाली. त्यांना विजयासाठी ३५ चेंडूत ८४ धावा हव्या होत्या. नेहराने १७व्या षटकांत महमुदुल्ला रियाथ (७) व मशरफी मूर्तझा (०) यांना पाठोपाठ बाद करीत ७ बाद शंभर धावा अशी अवस्था केली. मुश्फिकर रहीम १६, तर तस्किन अहमद १५ धावांवर नाबाद राहीला.
तत्पूर्वी डावाची सुरुवात करणाऱ्या रोहितने भारताची ३ बाद ४२ अशी अवस्था झाली असताना डाव सावरला. त्याला युवा हार्दिक पांड्याची योग्य साथ लाभली. त्याने १८ चेंडूंमध्ये ३१ धावा फटकावल्या. यजमान संघाचा ‘वंडरबॉय’ मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर पांड्याने षटकार ठोकला.
रोहित व पांड्या यांनी ४.३ षटकांत पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. त्यांनी केवळ १७ चेंडूंमध्ये अर्धशतकी भागीदारी नोंदवली. या दोन्ही फलंदाजांना अखेरच्या षटकात अल् अमिनने
माघारी परतवले. त्यानंतर कर्णधार धोनीने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत डावाचा समारोप केला. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. सरकार गो. अल् अमिन ८३, शिखर धवन त्रि. गो. अल् अमिन २, विराट कोहली झे. महमुदुल्लाह गो. मुर्तझा ०८, सुरेश रैना त्रि. गो. मुर्तझा १३, युवराज
सिंग झे. सरकार गो. शाकिब १५, हार्दिक पंड्या झे. महमुदुल्लाह गो. अल् अमिन ३१, महेंद्रसिंह धोनी नाबाद ०८, रवींद्र जडेजा नाबाद ००. अवांतर : ६, एकूण : २० षटकांत
६ बाद १६६. बाद क्रम : १-४, २-२२, ३-४२, ४-९७, ५-१५८, ६-१५८. गोलंदाजी : तस्किन अहमद ३-०-२२-०, अल् अमिन हुसेन ४-०-३७-३, मुस्तफिजुर रहमान ४-०-४०-०, मशरफी मुर्तझा ४-०-४०-१, महमुदुल्लाह २-०-९-१, शाकिब -अल-हसन
३-०-१५-१.
बांगलादेश : सौम्या सरकार झे. धोनी गो. बुमराह ११, मोहम्मद मिथून त्रि. गो. नेहरा १, शब्बीर रेहमान झे. धोनी गो. पंड्या ४४, इमरुल कायेस झे. युवराज सिंग गो. आश्विन १४, शाकिबुल हसन धावबाद (शर्मा/धोनी) ३, मुश्फिकर रहिम नाबाद १६, महमुदुल्ला रियाथ झे. शर्मा गो. नेहरा ७, मशरफी मुर्तजा झे. जडेजा गो. नेहरा ०, तस्किन अहमद नाबाद १५; अवांतर : १०; एकूण : २० षटकांत ७ बाद १२१; गडी बाद होण्याचा क्रम : १/९, २/१५, ३/५०, ४/७३, ५/८२, ६/१००, ७-१००; गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२३-३, जसप्रीत बुमराह ४-०-२३-१, हार्दिक पंड्या ४-०-२३-१, आर. आश्विन ४-०-२३-१, रवींद्र जडेजा ४-०-२५-०.