रॉलिन्सचे नाबाद शतक
By admin | Published: February 22, 2017 01:20 AM2017-02-22T01:20:08+5:302017-02-22T01:20:08+5:30
इंग्लंडचा अर्धा संघ ११२ धावांत गुंडाळल्यानंतरही भारतीय गोलंदाजांच्या दबावाला बळी न पडता डेलरे रॉलिन्सने नाबाद शतकी
नागपूर : इंग्लंडचा अर्धा संघ ११२ धावांत गुंडाळल्यानंतरही भारतीय गोलंदाजांच्या दबावाला बळी न पडता डेलरे रॉलिन्सने नाबाद शतकी खेळी करीत १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडला ५ बाद २४३ अशा सुस्थितीत आणले.
डेलरे रॉलिन्स १२४ धावा (२५४ चेंडू, १६ चौकार, २ षटकार) आणि विल जॅक्स ६६ धावा (१५३ चेंडू, १० चौकार) हे खेळपट्टीवर आहेत.
जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॅक्स होल्डनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनी सुरुवातीला तीन धक्के दिले त्यावेळी इंग्लंडची एक धाव फळ्यावर लागली होती. रिषभ भगतने हॅरी ब्रुकला (१) पायचित केले. जॉर्ज बार्टलेटचा शून्यावर त्रिफळा उडविला. कनिश सेठच्या चेंडूवर मॅक्स होल्डनला सिद्धार्थ आकरेने झेलबाद केले. डेलरे रॉलिन्स व ओली पोपने उपहारापर्यंत धावसंख्येला आकार दिला. रॉलिन्स- पोपने चौथ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. डेरिल फेरारिओने पोपला (४२ धावा) झेलबाद केले. इआॅन वुड्सला (५) यष्टिरक्षक एस. लोकेश्वरने झेलबाद करताच इंग्लंडची ५ बाद ११२ अशी अवस्था झाली होती. रॉलिन्सने चिवट झुंज देत १९४ चेंडंूत १४ चौकार व दोन षटकारांसह शतक तसेच विल जॅक्सने १२७ चेंडूंत ७ चौकाराच्या मदतीने अर्धशतक गाठले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला सुस्थितीत आणले. रिषभ भगतने दोन गडी बाद केले. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : हॅरी ब्रुक पायचित गो. भगत १, मॅक्स होल्डन झे. आकरे गो. सेठ ००, जॉर्ज बार्टलेट त्रि. गो. भगत ००, डेलरे रॉलिन्स खेळत आहे १२४, ओली पोप झे. फेरारिओ गो. त्यागी ४२, इआॅन वुड्स झे. लोकेश्वर गो. फेरारिओ ६, विल जॅक्स खेळत आहे ६६. अवांतर-४, एकूण-९० षटकांत ५ बाद २४३. गोलंदाजी : कनिश सेठ १/५४, रिषभ भगत २/३९, हर्ष त्यागी १/६०, डेलरे फेरारिओ १/५३.