रोनाल्डोला ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार
By admin | Published: January 14, 2015 02:28 AM2015-01-14T02:28:21+5:302015-01-14T02:28:21+5:30
फुटबॉल विश्वातील दिग्गज पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो याने आपला निकटचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सी याला मागे टाकून सलग दुसऱ्यांदा फिफाचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार पटकावला आहे.
झुरिच : फुटबॉल विश्वातील दिग्गज पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो याने आपला निकटचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सी याला मागे टाकून सलग दुसऱ्यांदा फिफाचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार पटकावला आहे.
रियल माद्रिदचा फॉरवर्ड रोनाल्डोने अर्जेंटिनाचा मेस्सी याच्या तुलनेत दुप्पट मते मिळविली. रोनाल्डोला एकूण तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. मेस्सी दुसऱ्या तर जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल नियुएर तिसऱ्या स्थानावर राहिला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदी झालेला रोनाल्डो म्हणाला, ‘‘मी संघाचाच नव्हे, तर जागतिक फुटबॉलचा महान खेळाडू बनू इच्छितो.’’ गतवर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात जर्मनीला जेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचे प्रशिक्षक जोआकिम लू हे सर्वोत्कृष्ट कोच ठरले. त्यांनी रियल माद्रिदचे कार्लो एन्सेलोट्टी आणि अॅटलेटिको माद्रिदचे दिएगो सायमन यांना मागे टाकले. कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज याला विश्वचषकात उरुग्वेविरुद्ध केलेल्या अप्रतिम गोलसाठी पुस्कास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हीएफएल व्होल्फबर्ग आणि जर्मनीची नदाईन कॅसलेर यांना महिला ‘प्लेयर आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाला.
फिफा अॅवॉर्डमध्ये सर्वांच्या नजरा रोनाल्डोवर खिळलेल्या होत्या. त्याचा संघ पोर्तुगाल खराब कामगिरीनंतर विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडला, तरीही रोनाल्डोने हा पुरस्कार कायम राखण्यात यश संपादन केले. जगातील २०९ राष्ट्रीय संघांचे कोच, कर्णधार, प्रत्येक देशातील एक पत्रकार यांनी यासाठी मतदान केले.
झुरिचमध्ये दोन तास चाललेल्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान रोनाल्डो म्हणाला, ‘‘तीनवेळा ही ट्रॉफी घरी घेऊन जाईन, असा कधी विचारही केला नव्हता. आता वारंवार ट्रॉफी जिंकायची आहे. जगातील महान खेळाडूंमध्ये स्थान मिळवायची इच्छा आहे.’’ बॅलन डी ओर अॅवॉर्डचे वैशिष्ट्य असे, की काही वर्षांपासून या पुरस्कारासाठी रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातच चढाओढ गाजत आहे. २००८, २०१३ आणि २०१४मध्ये रोनाल्डोने बाजी मारली.
मेस्सीनेदेखील चार वेळा हा पुरस्कार जिंकला. त्याला २००९ ते २०१२ असा सलग फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. या वेळी रोनाल्डो दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिला होता. गेल्या मोसमात रियल माद्रिदकडून रोनाल्डोने ४७ सामन्यांत ५१ गोल केले. यामुळे रियल माद्रिद चॅम्पियन्स लीग आणि किंग्स कप जिंकू शकला. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये क्लबसाठी १७ गोल, तर ला लीगाच्या १७ सामन्यांत २६ गोल नोंदविले. एकूण ५२ गोलसह तो पोर्तुगालचा
सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू ठरला आहे. (वृत्तसंस्था)