रॉयल चॅलेंजर्सही ‘प्ले आॅफ’मध्ये

By admin | Published: May 18, 2015 03:24 AM2015-05-18T03:24:00+5:302015-05-18T03:24:00+5:30

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी रविवारी आलेला पाऊस वरदान व शाप दोन्ही ठरला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे

Royal Challengers also play in 'Play-off' | रॉयल चॅलेंजर्सही ‘प्ले आॅफ’मध्ये

रॉयल चॅलेंजर्सही ‘प्ले आॅफ’मध्ये

Next

बंगलोर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी रविवारी आलेला पाऊस वरदान व शाप दोन्ही ठरला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यामुळे बंगळुरू संघाचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चित झाला, पण गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावित थेट क्वालिफायर वनसाठी पात्र ठरण्याच्या त्यांच्या निर्धाराला मात्र धक्का बसला आहे.
डेअरडेव्हिल्सने क्विंटन डिकॉक (६९) व कर्णधार जेपी ड्युमनी (नाबाद ६७) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ५ बाद १८७ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १.१ षटकात बिनबाद २ धावांची मजल मारली असता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळ झाला नाही.
पाऊस थांबल्यानंतर ७ वाजता खेळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अखेर पंचांनी ७ वाजून ४० मिनिटांना सामना रद्द करण्याची घोषणा केली. या निकालामुळे आरसीबीला एक गुण मिळाला. बंगळुरूच्या खात्यात एकूण १६ गुणांची नोंद असून प्ले आॅफमध्ये स्थान मिळवणारा आरसीबी तिसरा संघ ठरला.
त्याआधी, क्विंटन डिकॉक व कर्णधार जेपी ड्युमिनी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ५ बाद १८७ धावांची दमदार मजल मारली. डिकॉकने ३९ चेंडूंना सामोरे जाताना ३ षट्कार व ९ चौकारांच्या साहाय्याने ६९ धावांची खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसोबत (२०) सलामीला ५५ धावांची भागीदारी केली. ड्युमिनीने ४३ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षट्कारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा फटकावल्या.
नाणेफेक गमविल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या डेअरडेव्हिल्सला डिकॉक व अय्यर यांनी चांगली सुरुवात करून दिली. डिकॉकने आक्रमक पवित्रा स्वीकारताना हर्षलच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकले. त्यानंतर अशोक डिंडाच्या षटकातही दोन चौकार वसूल केले. अय्यरने डिंडाच्या गोलंदाजीवर चौकार व मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षट्कार ठोकला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला ५४ धावांची मजल मारून दिली. अय्यरचा अडथळा हर्षलने दूर केला. डिकॉकने डेव्हिड वाइसीच्या गोलंदाजीवर एक षट्कार व दोन चौकार वसूल करीत ३० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. संघाला शतकाची वेस ओलांडून दिल्यानंतर डिकॉक चाहलचे लक्ष्य ठरला.
त्यानंतर कर्णधार ड्युमिनीने संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळताना चाहलच्या गोलंदाजीवर सलग दोन षट्कार वसूल केले. युवराज सिंगने (११) याच षटकात एक षट्कार ठोकला, पण त्यानंतरच्या चेंडूवर षट्कार ठोकण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. हर्षलने केदार जाधवला (०) बाद करीत दिल्ली संघाला चौथा धक्का दिला, तर अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (०१) दुर्दैवीपणे धावबाद झाला. ड्युमिनीने स्टार्कच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत ३५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या षटकात हर्षलच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल केले. सौरव तिवारीने (नाबाद १३) एक शानदार षट्कार ठोकला. (वृत्तसंस्था)

Web Title: Royal Challengers also play in 'Play-off'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.