रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची अंतिम फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 11:30 PM2016-05-24T23:30:24+5:302016-05-24T23:40:17+5:30
आयपीएलच्या क्वालिफायर राऊंडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं गुजरात लायन्सवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला
ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. 24- आयपीएलच्या क्वालिफायर राऊंडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं गुजरात लायन्सवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीनं 158 धावांचा पाठलाग करताना 18.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा करून विजय खेचून आणला आहे.
बंगलोरकडून ए. बी. डिव्हिलियर्सनं नाबाद खेळी करत भेदक फलंदाजीच्या जोरावर शेवटपर्यंत टिकून राहत 5 चौकार आणि 5 षटकार मारत अर्धशतक पार करत 79 धावांची खेळी केली. कॅप्टन विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेला ख्रिस गेल 9, वॅटसन 1, बेबी 0 आणि बिन्नी 21 धावांवर बाद झाला. तर, अब्दुल्लानं नाबाद 33 धावांची खेळी केली. त्याआधी गुजरात लायन्सनं निर्धारित 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातकडून स्मिथनं सर्वाधिक धावांची खेळी करत 5 चौकार आणि 6 षटकार लगावत अर्धशतक पार करत 73 धावा केल्या. तर फिंच 4, मॅक्युलम 1, रैना 1, जडेजा 3, ब्राव्हो 8, द्विवेदी 19, कुमार 1, कुलकर्णी 10 धावा काढून तंबूत परतले. कार्तिकही 30 चेंडूंत 26 धावांची खेळी करून माघारी फिरला. कार्तिक आणि स्मिथनं भेदक फलंदाजीच्या जोरावर 85 धावांची भागीदारी केली. बंगलोरकडून उत्तम गोलंदाजीच्या जोरावर वॅटसननं रैना, जडेजा, द्विवेदी आणि ब्राव्होला घरचा रस्ता दाखवला. तर अब्दुल्ला, जॉर्डननं भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 2 गडी मिळवले.