रॉयल चॅलेंजर्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सशी गाठ
By Admin | Published: May 17, 2015 01:26 AM2015-05-17T01:26:09+5:302015-05-17T01:26:09+5:30
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ रविवारी अखेरच्या साखळी लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजयासह ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याच्या इराद्याने खेळणार आहे.
बेंगळुरु : सनरायझर्स हैदराबादला रोमहर्षक सामन्यात धूळ चारल्यानंतर उत्साहाचा संचार झालेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ रविवारी अखेरच्या साखळी लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजयासह ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याच्या इराद्याने खेळणार आहे.
आरसीबीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता; पण हा संघ अद्याप प्ले आॅफचा दावेदार आहे. १३ सामन्यांत १५ गुणांसह संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीवर विजय मिळाल्यास स्थान निश्चित होईल. दुसरीकडे १३ सामन्यांत १० गुण घेणारा दिल्ली आधीच प्ले आॅफमधून बाहेर पडला.
आरसीबीच्या फलंदाजीची धुरा कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल आणि डिव्हिलियर्स या त्रिकूटाच्या खांद्यावर आहे. हे तिघे फॉर्ममध्ये असतील तर संघाचा विजय हमखास मानला जातो. काल ११ षटकांच्या सामन्यात हैदराबादचा एक चेंडू शिल्लक राखून डकवर्थ- लुईस पद्धतीच्या आधारे सहा गड्यांनी पराभव केला. त्यात गेलचे ३५ आणि कोहलीचे नाबाद ४४ धावांचे योगदान होते. या सामन्यात आरसीबीला सहा षटकांत ८१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्याआधी डिव्हिलियर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर नाबाद १३३ धावा ठोकल्या होत्या. दिल्लीविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची आरसीबीला आशा आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचे तर आरसीबीची भिस्त मिशेल स्टार्कवर असेल. दिल्लीने संपूर्ण स्पर्धेत लय मिळविली नसेल पण मागच्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविला होता. त्यात सलामीवीर श्रेयस अय्यरने नाबाद ७० धावा केल्या तर अनुभवी वेगवान गोलंदाज जहीर खानने दोन गडी बाद केले होते.
लिलावाच्या वेळी सर्वाधिक महागडा ठरलेला युवराजसिंग याने घोर निराशा केली. सुरुवातीला चांगली कामिगिरी केल्यानंतर जेपी ड्युमिनी हादेखील अपेक्षेनुरुप खेळताना दिसत नाही. याशिवाय यष्टिरक्षक - फलंदाज क्वींटन डिकॉक हादेखील धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. गोलंदाजीत जहीरने चांगला मारा केला असला तरी अन्य गोलंदाजांच्या चेंडूतील धार बोथट झाल्याचा प्रत्यय आला आहे. (वृत्तसंस्था)
रॉयल चँलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, मिचेल स्टार्क, नीक मॅड्डल्सन, वरुण अॅरोन, अशोक डिंडा, हर्षल पटेल, विजय झोल, अबू नेचीम, सदीप वॉरीयर, योगेश ताकावले, युजवेंद्र चहल, रीली रॉसो, इक्बाल अब्दुल्ला, मनविंदर बिस्ला, मनदीप सिंग, दिनेश कार्तिक, सुब्रमणियम बद्रीनाथ, डॅरेन सॅमी, सीन एबोट, डेव्हीड वाइस, सरफराज खान, जलज सक्सेना, शिशीर भावणे आणि श्रीनाथ अरविंद.