रॉयल चॅलेंजर्सचे पारडे जड
By admin | Published: May 13, 2015 12:20 AM2015-05-13T00:20:37+5:302015-05-13T00:20:37+5:30
प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करण्यास प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला आयपीएलच्या आठव्या पर्वात बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या
मोहाली : प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करण्यास प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला आयपीएलच्या आठव्या पर्वात बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गुणतालिकेत सर्वांत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हनविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे पारडे वरचढ राहण्याची शक्यता आहे. आरसीबी संघाने विजय मिळविला, तर त्यांना गुणतालिकेत चौथे स्थान पटकावण्याची संधी आहे. सध्या राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी आहे. विजयासह आरसीबी संघाला प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचा दावा अधिक मजबूत करण्याची संधी असेल.
सध्या आरसीबीने ११ सामन्यांत १३ गुणांची कमाई केली असून, हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने १२ सामन्यांत केवळ ४ गुणांची कमाई केली आहे. पंजाब संघ प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे.
बंगळुरूने यापूर्वीच्या लढतीत पंजाबचा १३८ धावांनी पराभव केला होता. आरसीबी संघात ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स व कर्णधार विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या पाच फलंदाजांपैकी दोन डिव्हिलियर्स (४३६) व कोहली (४१७) हे आरसीबी संघात आहेत. ३७० धावा फटकावणारा ख्रिस गेल या यादीत सातव्या स्थानी आहे. यंदाच्या मोसमात गेल व डिव्हिलियर्स यांच्याव्यतिरिक्त शतकी खेळी करण्याचा मान चेन्नई सुपरकिंग्जच्या बे्रंडन मॅक्युलमने मिळविला आहे. गेलने पंजाबविरुद्धच्या लढतीत केवळ ५७ चेंडूंना सामोरे जाताना ११७ धावा फटकावल्या होत्या, तर डिव्हिलियर्सने मुंबईविरुद्ध ५९ चेंडूंमध्ये १३३ धावांची खेळी केली केली होती. हे दोन्ही दिग्गज खेळाडू बुधवारच्या लढतीत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहेत. गोलंदाजीमध्ये आॅस्ट्रेलियाचा मिशेल मार्श आरसीबी संघाची धुरा सांभाळत आहे. ८ सामन्यांत १६ बळी घेणारा मार्श सर्वाधिक बळी
घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.
श्रीनाथ अरविंद, डेव्हिड वीज व हर्षल पटेल यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने १० सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता, गेल्या मोसमातील उपविजेत्या पंजाब संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील संघाला १२ पैकी केवळ २ सामने जिंकता आले. सलग ७ पराभव स्वीकारणारा पंजाब संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. पंजाब संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच शिल्लक उरलेले नाही; त्यामुळे त्यांना आरसीबीच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याची संधी आहे. पंजाब संघात मुरली विजय, मनन व्होरा, रिद्धिमान साहा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर व कर्णधार बेली यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांचा समावेश आहे; पण त्यांना अद्याप सांघिक कामगिरी करता आलेली नाही. बुधवारच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचे मिशेल जॉन्सन व शॉन मार्श खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही खेळाडू विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशी परतणार आहेत. (वृत्तसंस्था)