रॉयल चॅलेंजर्सचा भेदक मारा, नाइट रायडर्स 131 धावांत गारद
By admin | Published: April 23, 2017 10:22 PM2017-04-23T22:22:42+5:302017-04-23T22:22:42+5:30
कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलमध्ये आज झालेल्या दुस-या लढतीत बंगळुरूसमोर 132 धावांचेच आव्हान ठेवता आले.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - घणाघाती सलामीनंतर फलंदाजी कोलमडल्याने कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएलमध्ये आज झालेल्या दुस-या लढतीत बंगळुरूसमोर 132 धावांचेच आव्हान ठेवता आले. सुनील नारायण आणि गौतम गंभीरच्या दमदार सलामीनंतर टायमल मिल्स, युझवेंद्र चहल आणि पवन नेगीने भेदक गोलंदाजी करत कोलकात्याला अवघ्या 131 धावांतच रोखले.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर सुनील नारायण आणि गौतम गंभीर यांनी कोलकात्याला दमदार सुरुवात करून दिली. पण चांगल्या सुरुवातीचा कोलकात्याला फायदा उठवता आला नाही. गौतम गंभीर (14) आणि सुनील नारायण (34) हे बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोलमडला.
रॉबिन उथप्पा (11) युसूफ पठाण (8), मनीष पांडे (15), कॉलिन ग्रँडोम (0) हे झटपट बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था सहा बाद 93 अशी झाली. त्यानंतर ख्रिस व्होक्स (18) आणि सूर्यकुमार यादव (15) यांनी संघाला कशीबशी शंभरी पार करून दिली. पण ही जोडी फुटल्यावर कोलकात्याची पुन्हा घसरगुंडी उडाली. अखेर कोलकात्याचा डाव 131 धावांवरच आटोपला. बंगळुरूकडून चहलने 3, मिल्स आणि नेगीने प्रत्येकी 2 तर बिन्नी, बद्री आणि अरविंदने प्रत्येकी एक गडी गारद केला.