रॉयल्सची गाठ सनरायजर्सशी
By admin | Published: April 16, 2015 01:26 AM2015-04-16T01:26:37+5:302015-04-16T01:26:37+5:30
आयपीएल-८ मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सची गाठ गुरुवारी ‘हौसला बुलंद’ हैदराबाद सनरायजर्सशी पडेल.
विशाखापट्टणम : आयपीएल-८ मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सची गाठ गुरुवारी ‘हौसला बुलंद’ हैदराबाद सनरायजर्सशी पडेल. रॉयल्सने आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले असून, सलग चौथ्या विजयासाठी हा संघ खेळणार आहे. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने दोनपैकी एक सामना जिंकला तर एक गमावला. मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर प्रेक्षणीय विजय नोंदविल्याने हैदराबादचा आत्मविश्वास उंचावला. उद्याचा सामना वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम या दुसऱ्या स्थानिक स्टेडियमवर खेळायचा असल्याने स्थानिक चाहत्यांचा पाठिंबा त्यांनाच मिळेल.
रॉयल्सचा नियमित कर्णधार शेन वॉटसन तिन्ही सामन्यांत खेळू न शकल्याने स्टीव्हन स्मिथ नेतृत्व करीत आहे. रॉयल्सने सलामीला किंग्स पंजाबला, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला धूळ चारली. कालच्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सला सात गड्यांनी लोळविले होते. आॅरेंज कॅपचा मानकरी असलेल्या स्मिथने तीन सामन्यांत १२२ धावा केल्या. मुंबईविरुद्ध त्याने ५३ चेंडूंत ७९ धावा ठोकून पाच चेंडूआधीच संघाचा विजय साजरा केला होता. स्टार खेळाडूंशिवाय या संघातील युवा खेळाडूंनी देखील लक्ष वेधले. दीपक हुडा याने दिल्लीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली.
या संघाच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व टीम साऊदी करणार असून, द. आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी आणि प्रवीण तांबे तसेच आॅस्ट्रेलियाचा जेम्स फॉल्कनर हे त्याला सहकार्य करतील. हैदराबादची गोलंदाजीदेखील आक्रमक आहे.
या संघात ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि प्रवीण कुमार हे वेगवान मारा करणारे खेळाडू आहेत. फलंदाजीत स्वत: वॉर्नर, शिखर धवन, केन विलियम्सन आणि लोकेश राहुल हे धडाकेबाज फलंदाज असल्याने किमान कागदावर तरी हा सामना बरोबरीचा वाटतो. या संघांचा परस्परांविरुद्धचा रेकॉर्डही चांगलाच आहे. त्यामुळे उद्याची लढत रोमहर्षक होईल यात शंका नाही.(वृत्तसंस्था)
हेड टू हेड...
सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत ५ वेळा एकमेकांसमोर ठाकले आहेत. यामध्ये सनराइजर्स संघाने २, तर राजस्थान संघाने ३ वेळा विजय नोंदविला आहे.
शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, दिशान्त याज्ञिक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युुआन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी व प्रदीप साहू.
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोझेस हेनरिक्स, इयान मॉर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशीष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, लक्ष्मीरतन शुक्ला, प्रवीण कुमार, हनुमान विहारी, प्रशांत पद्मनाभन व सिद्धार्थ कौल.