‘रुबीगुला’चे अनावरण लांबणीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:12 PM2018-12-16T20:12:25+5:302018-12-16T20:13:23+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वेळेच्या अभावाचा पहिला झटका
सचिन कोरडे : गोव्यात ३० मार्च ते ४ एप्रिल २०१९ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला टप्पा म्हणून स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण याकडे पाहिले जात होते. मात्र, वेळेच्या अभावामुळे बोधचिन्ह म्हणून निवड केलेल्या ‘रुबीगुला’चे अनावरण लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गोव्यात होणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्य पक्षी असलेल्या बुलबुल (रुबीगुला) याची बोधचिन्ह म्हणून निवड करण्यात आली होती. या बोधचिन्हाचे अनावरण २० डिसेंबर रोजी एका पंचतारांकित हॉटेलात करण्याचे ठरविण्यात आले होते. याबाबत गुप्तताही पाळण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांत ही सर्कस करायची कशी? असा प्रश्न आयोजन समितीपुढे निर्माण झाला होता. काही शासकीय प्रक्रिया सुद्धा शिल्लक होती. त्यामुळे सरकारी पातळीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात धन्यता मानण्यात आली. आता हा सोहळा जानेवारीत होईल. मात्र, त्यासंदर्भात तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
दरम्यान, गोव्यात होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेध तमाम खेळाडूंना लागले आहेत. स्पर्धेसाठी सुरू असलेल्या तयारीचा वेग मात्र संशयास्पद आहे. त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संघटनांच्या मागण्याही अपूर्णच आहेत. त्यांचेही समाधान झालेले नाही. दुसरीकडे, आयोजन समिती ही स्पर्धा वेळेवरच होईल, अशी आश्वासने देत आहे.
यासंदर्भात, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे संयुक्त सीईओ व्ही. एम. प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही २० डिसेंबर रोजी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करणार होतो. २० डिसेंबर ही तारीख गृहीत धरलेली होती. त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब नव्हते. शासकीय पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्या. तसेच वेळेचा अभाव याचाही विचार करता आम्ही बोधचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात घेण्याचे ठरवले आहे. हा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आलेला आहे.