रुदिशा, कॅबालेरोला सुवर्ण
By admin | Published: August 26, 2015 04:31 AM2015-08-26T04:31:10+5:302015-08-26T04:31:10+5:30
आॅलिम्पिकविजेता आणि जागतिक विक्रमवीर केनियाच्या डेव्हिड लेकुदा रुदिशाने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक
बीजिंग : आॅलिम्पिकविजेता आणि जागतिक विक्रमवीर केनियाच्या डेव्हिड लेकुदा रुदिशाने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपली मक्तेदारी कायम राखली. दुसरीकडे महिलांच्या थाळीफेक प्रकारात क्युबाच्या बेनिया कॅबालेरोने आॅलिम्पिक व गतविजेती क्रोएशियाच्या सांद्रा पॅर्कोव्हिचला पराभवाचा धक्का दिला. जमेकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट आणि त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेचा जस्टिन गॅटलिन यांनी पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बर्डनेस्ट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी केनियाच्या रुदिशाने गुडघ्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १ मि. ४५.८४ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पोलंडच्या एडम काजजोटनने १ मि. ४६.०८ सेकंदांची वेळ देऊन रौप्य, तर बोस्निया हर्जेगोविनाच्या आमेल टुकाने १ मि. ४६.३० सेकंदांची वेळ नोदंवून कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या थाळीफेक प्रकारात क्युबाच्या बेनिया कॅबालेरोने ६९.२८ मीटर थाळी भिरकावून गतविजेती व आॅलिम्पिक सुवर्णपदविजेती क्रोएशियाच्या सांद्रा पॅर्कोव्हिचला दुसऱ्या क्रमांकावर टाकून सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. सांद्राला ६७.३९ मीटर थाळी टाकत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या दानिन म्युलरने ६५.५३ मीटर थाळी फेकून कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ब्रिटनच्या ग्रेग रदरफोर्डने ८.४१ मीटर अंतर पार करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. आॅस्ट्रेलियाचा फेब्रिस लेपियेर (८.२४ मी.) व चीनचा जियानान वांग (८.१८ मी.) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत कोनियाच्या निकोलस बॅटने ४७.७९ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. रशियाच्या डेनिस कुद्रयावत्सव (४८.५० सें.) आणि बहमासच्या जर्फरी गिब्सनने (४८.१७ सें.) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत इथिओपियाच्या गेंजेबे बिबाबाने ४ मि. ०८.०९ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या फेथ किपयेगोनने ४ मि. ०८.९६ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक तर हॉलंडच्या सिफान हसनने ४ मि. ०९.३४ सेकंदांची
वेळ नोंदवून कांस्यपदक आपल्या नावे केले.
पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीतसुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता होती. या शर्यतीत बोल्ट व गॅटलिन कोणती वेळ नोंदवतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण उपांत्य फेरीत
त्यांनी नोंदविलेल्या वेळेनुसार
त्यांना धावण्याची लेन मिळणार
आहे. उसेन बोल्टने आपल्या हिटमध्ये शेवटचे १५ मीटरचे अंतर जरा जोरात पळून २०.२८ सेकंदांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक जिंकला. नंतरच्या हिटमध्ये २००५चा चॅम्पियन आणि २०१३पासून २०० मीटरमध्ये अपराजित राहिलेला ३३ वर्षीय गॅटलिन याने २०.१९ सेकंदांची वेळ नोंदवली. या
शर्यतीत सर्वांत कमी २०.०१
सेकंदांची वेळ वेळ तुर्कीच्या रामिल गुलियेव्हने दिली. (वृत्तसंस्था)