नेहरू स्टेडियममध्ये धावपटूने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:40 AM2018-11-15T07:40:32+5:302018-11-15T07:41:54+5:30
२०१७ साली युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौधरीने रिलेचे सुवर्ण जिंकले होते.
नवी दिल्ली : १०० आणि २०० मीटर वेगवान शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व केलेला १८ वर्षांचा युवा धावपटू पालिंदर (परविंदर) चौधरी याने जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या प्रकाराच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
२०१७ साली युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौधरीने रिलेचे सुवर्ण जिंकले होते. याशिवाय युवा विश्व चॅम्पियनशिपमध्येही तो सहभागी झाला होता. चौधरीला सफदरजंग इस्पितळात हलविण्यात येत असताना त्याचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगितले जाते. साईच्या संचालक नीलम कपूर यांनी म्हटले की, ‘ही घटना आमच्या परिसरात झाल्याने विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.’ ‘साई’चे सचिव स्वर्णसिंग छाब्रा यांच्या नेतृत्वाखालील समिती आठवडाभरात या घटनेचा अहवाल सादर करेल, असे स्पष्ट करण्यात आले असून कुठलीही चिठ्ठी चौधरीजवळ मिळाली नसल्याने या घटनेमागील कारणही स्पष्ट नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.