कौतुकास्पद! ठाण्यातील धावपटू निधी व ईशाची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड!
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 22, 2022 03:38 PM2022-09-22T15:38:28+5:302022-09-22T15:39:14+5:30
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ठाणे महापालिका प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या निधी सिंग आणि ईशा नेगी यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड होणे ही ठाणे जिल्ह्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे.
ठाणे : ठाण्यातील धावपटू निधी सिंग आणि ईशा नेगी या दोघींची गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अॅथलेटिक्स संघात निवड झाली आहे. या दोघींचाही महाराष्ट्राच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघात समावेश झाला आहे. ही अॅथलेटिक्स स्पर्धा ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ठाणे महापालिका प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या निधी सिंग आणि ईशा नेगी यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड होणे ही ठाणे जिल्ह्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. त्याचप्रमाणे निधी व ईशाचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. निलेश पाटकर हे जागतिक अॅथलेटिक्स संघटनेचे मान्यताप्राप्त द्वितीय स्तर परीक्षेत यशस्वी झालेले प्रशिक्षक आहेत.
या तिघांची निवड झाल्याबद्दल ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने आनंद व्यक्त केला असून तिघांनाही तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या संघात शुभेच्छा दिल्या आहेत. निधी म्हणाली की, मी काही वर्षांपासून कठोर प्रशिक्षण घेत आहे. हा माझा पहिला राष्ट्रीय खेळ आणि कोरोनानंतरची मोठी स्पर्धा असेल. मी खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहे हे योगायोगाने आहे.
ईशाने सांगितले की, “मी प्रथमच वरिष्ठ स्तरावर भाग घेत आहे. हा माझा पहिला राष्ट्रीय खेळ आहे. मी कनिष्ठ स्तरावर चांगली कामगिरी करत आहे. माझ्या नवीन सुधारणामुळे माझे पालक खूप आनंदी आहेत.’ पाटकर यांनी निधी आणि ईशा या दोघीही मेहनती खेळाडू आहेत. त्या दोघांसाठी मी आनंदी आहेअशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
निधीने यापूर्वी आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१९ आणि एसएएफ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१९ मध्ये रौप्यपदक मिळवले आहे. खेलो इंडिया गेम्समध्ये चार पदके मिळवणारी ती ठाणे जिल्ह्यातील एकमेव अॅथलिट होती. यंदा तिने ४०० मीटरमध्ये रौप्य आणि ४०० मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक मिळवले. रिले इव्हेंटच्या राज्य चाचणीत तिने प्रथम क्रमांक पटकावला.
ईशा ही ज्युनियर ॲथलिट आहे. तिने महाराष्ट्र राज्य ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये ४०० मीटर आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. ती ज्युनियर राष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे.