महाराष्ट्रातील आदिवासी धावपटूंची गोव्यात चमक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 08:47 PM2019-11-19T20:47:56+5:302019-11-19T20:48:47+5:30
गोवा रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी
पणजी : चिखली (वास्को) येथे पार पडलेल्या १० व्या रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत पालकर (महाराष्ट्र) जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील चार आदिवासी तरुणांनी चमक दाखविली. या चौघांनी १० किमी शर्यतीत ठसा उमटविला. यामध्ये २१ वर्षीय रोहिदास मोरघाने दहा कि.मी.ची शर्यत अवघ्या ३४.५२ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्याचा साथीदार २० वर्षीय दिनेश म्हात्रे याने ३५.०६ मिनिटे वेळ घेत दुसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, त्यांची सहकारी, दहावीत शिकणारी योगीता मराळे हिने महिलांच्या दहा किमीच्या शर्यतीत ४५.१५ मिनिटांच्या अवधीत शर्यत पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. तिची सहकारी २० वर्षीय कविता भोईरने ४९.०० मिनिटांत शर्यत पूर्ण करीत चौथा क्रमांक पटकावला. रोहिदास आणि दिनेश, उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयाचे दोन्ही पदवीधर विद्यार्थी १० किमी रेसमध्ये नियमितपणे मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात. कविता आणि योगीता आंतरजिल्हा क्रॉस कंट्री रेसमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. चौघांनी मुंबईहून मडगावपर्यंत आणि परत जातानाही रेल्वेने प्रवास केला.
रोहिदास याच्या म्हणण्यानुसार, त्यांना शर्यत नोंदणी, प्रवास आणि भोजन यासाठी प्रत्येकी ३००० रुपये खर्च झाला असून त्यांनी केलेल्या कर्तृत्वासाठी रोख बक्षिसे मिळाल्यामुळे त्यांचा आर्थिक भार हलका झाला आहे. रोहिदासने प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे १५ हजार रुपये रोख, दिनेश आणि योगीताने दुसरा क्रमांक पटकाविल्यामुळे १२ हजार ५०० रुपये आणि कविताने चौथा क्रमांक पटकाविल्यामुळे ७ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. रोख बक्षिसे मिळाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि पुढच्या वर्षी पुन्हा जिंकण्यासाठी परत येणार असल्याची प्रतिक्रिया रोहिदास याने दिली.