रसल दिब्रिटो ठरला मुंबई श्रीचा विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:41 PM2020-03-02T19:41:58+5:302020-03-02T19:57:31+5:30
फिजीक स्पोर्टस् मध्ये रेणूका मुदलियार विजेती तर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारी सरस
मुंबई - वेडी माणसे इतिहास रचतात हे पुन्हा एकदा खरं ठरलं. सात महिन्यांपूर्वी सामान्य देहयष्टीच्या खेळाडूने देहभान विसरून आपल्या शरीरावर घेतलेली मेहनत संस्मरणीय ठरली. बॉडी वर्पशॉपच्या रसल दिब्रिटोने सर्वांना थक्क करणारे आपल्या पीळदार शरीराचे अद्भूत दर्शन घडवत जेतेपदाचे संभाव्य दावेदार असलेल्या सुशील मुरकर आणि निलेश दगडेवर मात केली आणि शरीरसौष्ठव जगतातले ऑस्कर असलेल्या "स्पार्टन मुंबई श्री" किताबावर आपले नाव कोरले. हवाई सुंदरी असलेल्या फॉरच्युन फिटनेसच्या रेणूका मुदलियारने दिपाली ओगले आणि डॉ. मंजिरी भावसार यांच्यावर कुरघोडी करत फिजीक स्पोर्टस् प्रकारात "मिस मुंबई"चे जेतेपद संपादले तर अमला ब्रम्हचारीने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर शरीरसौष्ठवात "मिस मुंबई"चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टसमध्ये अरमान अन्सारी आणि आतिक खान यांनी बाजी मारली.
शरीरसौष्ठवाची दिमाखदार स्पर्धाही वेळेत होऊ शकते, हे दाखवून देण्याची किमया बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने केली. तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद दाखविणारा स्पार्टन मुंबई श्रीचा फिटनेस सोहळा अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबच्या मैदानात मोठ्या दणक्यात पार पाडला. एकंदर 12 गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत रसल दिब्रिटोने उपस्थितांना तोंडात बोटे घालायला भाग पाडणारी अनपेक्षित कामगिरी करीत सोनेरी यश संपादले. शिवसेनेचे खासदार आणि शरीरसौष्ठवाचे आश्रयदाते गजानन कीर्तीकर, शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज मधुकर तळवलकर, विक्रम रोठे, अमोल कीर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे आणि या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते स्पार्टन न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा डॉ. विक्रम चोक्सी आणि ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजनासाठी क्रीडाप्रेमी सुबोध मेनन, माजी भारत श्री श्याम रहाटे, सिद्धेश रामदास कदम यांच्यासह भारतीय आयुर्विमा महामंडळ, इएन न्यूट्रिशन, जीएनसी, हेल्थ बूस्टर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
जिद्दीला देवपण खाली येतो - रसल दिब्रिटो
माझे सोनेरी यश हे फक्त आणि फक्त माझे गुरू संजय चव्हाण यांचेच आहे. त्यांनी माझ्यासारख्या दगडाला अवघ्या सात महिन्यात सोनं करण्याचा चमत्कार करून दाखविला. त्यांनी मला पाहताच सांगितले होते, तू मुंबई श्री जिंकू शकतो, फक्त मी सांगेन तसंच करायचे. मग मी गेले सात महिने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ते म्हणतील, तसंच केलं. आज मी जेव्हा स्वत:ला आरशात पाहतो, तेव्हा मलाच माझ्यावर विश्वास बसत नाहीय. मी जिद्दीने, वेड्यासारखं सात महिने वर्कआऊट केलं. डाएट केलं. जिद्दीला साथ देण्यासाठी देवपण खाली येतो. माझ्या जिद्दीला, मेहनतीला देवाचा भरभरून आशीर्वाद लाभला. चव्हाण सरांच्या परिसस्पर्शाने माझ्या कारकीर्दीचं अक्षरश: सोनं झालं आहे. मी आयटी इंजीनिअर असलो तरी आता मला माझ्या शरीरसौष्ठवाच्या वेडेपणात करिअर घडवायचंय. मुंबई श्री नंतर आता महाराष्ट्र श्री आणि भारत श्री स्पर्धेतही मला सोनेरी यश मिळवायचेय आणि ते मी मिळवूनच माझे पुढचे ध्येय निश्चित करेन.
सुशील, निलेशपेक्षाही सरस
"स्पार्टन मुंबई श्री"च्या जेतेपदाच्या यादीत भास्कर कांबळे, निलेश दगडे, सुशील मुरकर हे तिघे आघाडीवर होते. पण "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" च्या लढाईत जजेसनी सुशील मुरकर, निलेश दगडेसह रसल दिब्रिटोची निवड करून तिघांमध्ये कंपेरिझन केली. या तुलनेत काही पोझेसमध्ये सुशील वरचढ दिसत होता तर काही पोझेसमध्ये रसलला तोडच नव्हती. रसलच्या नागाच्या फण्यासारख्या पाठीने सुशील आणि निलेशवर मात करत जजेसची मनंही जिंकली. स्पर्धेपूर्वी एकही स्पर्धा न खेळलेल्या रसल दिब्रिटोची अंगावर शहारे आणणारी शरीरयष्टी पाहून क्रीडाप्रेमीही थक्क झाले होते. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटातील उमेश गुप्ताचे प्रदर्शनही अफलातून होते. 75 किलो वजनी गटात बाजी मारणारा भास्कर कांबळे जेतेपदाच्या लढतीत टिकला नाही.
रेणूका मुदलियार : हवाई सुंदरी ते मिस मुंबई
स्पाईस जेट विमान कंपनीत 'हवाई सुंदरी" म्हणून गेली नऊ वर्षे सेवा देत असलेल्या फॉरच्युन फिटनेसच्या रेणूका मुदलियारने फिजीक स्पोर्टस् प्रकारात कसलेल्या दिपाली ओगले आणि मंजिरी भावसारला अनपेक्षित धक्का दिला. आयुष्यात काहीतरी नाविण्य असावं म्हणून आपल्या नवऱयाच्या आग्रहाखातर तिने फिटनेसकडे लक्ष दिले. स्वताही एक चांगला शरीरसौष्ठवपटू असलेल्या भारत जनौतीने रेणूकाला प्रोत्साहन देत तिला फिजीक स्पोर्टस् प्रकारात नशीब आजमविण्याचा सल्ला दिला. वर्षभरापूर्वी आपल्या भारतातही बिकीनी घालून मुली आपलं फिजीक दाखवतात, याची कल्पनाही नसलेल्या रेणूकाला दंगलच्या आमीर खानप्रमाणे कोचगिरी करत तिच्या नवऱयाने दिला फिजीक स्पोर्टससाठी तयार केले. नवऱ्याने माझ्याकडून करून घेतलेली मेहनत आणि मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मला आज बिकीनी घालून स्टेजवर मिरविण्याचे धाडस दाखवता आल्याची प्रांजळ कबूली फिजीक स्पोर्टस्च्या मिस मुंबई रेणूकाने दिली. तसेच विजयानंतर ती म्हणाली, तुमच्याही घरी मुलगी, सून, बायको, बहिणीला कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांना प्रोत्साहन द्या, असे आवाहनही तिने तमाम कुटुंबियांना केलं. मिस मुंबईचा किताब जिंकल्यानंतर रेणूकाला आपला आनंदही साजरा करता आला नाही. कामाच्या व्यस्ततेमुळे मध्यरात्री 3 चे विमान पकडून तिला गुवाहाटीला जावे लागले. विमान कंपन्यांमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्यामुळे तिला आपले काम सांभाळून आपल्या पॅशनसाठी वेळ काढताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.
स्पार्टन मुंबई श्री 2020 चा निकाल
55 किलो वजनी गट : 1. निलेश कोळेकर (परब फिटनेस), 2. नितीन शिगवण (पातुंड जिम), 3. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप), 4. राजेश तारवे (डी. एन. फिटनेस), 5. अजिंक्य पवार (बाल व्यायाममंदिर), 6. किशोर कदम (परब फिटनेस).
60 किलो वजनी गट : 1. देवचंद गावडे (परब फिटनेस), 2. प्रितेश गमरे (शिवाजी जिम), 3. विराज लाड (प्रभादेवी), 4. गणेश पारकर (परब फिटनेस), 5. अरूण पाटील (जय भवानी जिम), 6. मो. सलीम शेख ( बॉडी वर्कशॉप).
65 किलो वजनी गट : 1. उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), 2. तेजस भालेकर(परब फिटनेस), 3. शैलेश गायकवाड (ग्रेस फिटनेस), 4. बप्पन दास (डी. एन. फिटनेस). 5. चेतन खारवा ( माँसाहेब जिम), 6. वैभव जाधव ( एच. आर. जिम).
70 किलो वजनी गट : 1. मनोज मोरे (बाल मित्र जिम), 2. आशिष लोखंडे ( परब फिटनेस), 3. राहुल तर्फे (फॉरच्युन फिटनेस), 4. संतोष भरणकर (परब फिटनेस), 5. उमेश पांचाळ (परब फिटनेस), 6. चिंतन दादरकर (आर. एम. भट जिम)
75 किलो वजनी गट : 1. भास्कर कांबळे (ग्रेस जिम), 2. सुजित महापात्रा (दांडेश्वर जिम), 3. अर्जुन कुंचीकोरवे (डी. एन. फिटनेस), 4. सिद्धांत यादव (बाल मित्र जिम), 5. रोहन गुरव (बाल मित्र जिम), 6. रोनित कदम (प्रबोधन जिम).
80 किलो वजनी गट : 1. सुशील मुरकर (वीर सावरकर जिम), 2. सुशांत रांजणकर (आर. एम. भट जिम), 3. गणेश पेडामकर (गुरूदत्त जिम), 4. स्वप्निल मांडवकर (फॉरच्युन फिटनेस), 5. प्रफुल फ्रधान ( आर. एम. भट जिम), 6. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन).
85 किलो वजनी गट : 1. दिपक तांबिटकर (फॉरच्युन फिटनेस), 2. नितांत कोळी (मसल फॅक्टरी), 3. कुमार पेडणेकर (माय फिटनेस), 4. कल्पेश नरडेकर (धरमवीर जिम), 5. अविनाश हिरोजी (बॉडी वर्कशॉप), 6. संतोष यादव (एस.आर. फिटनेस).
90 किलो वजनी गट : 1. रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), 2. अरूण नेवरेकर ( स्टील बॉडी जिम), 3. उबेग रियाज पटेल ( बेस्ट हाऊस जिम), 4. महेश राणे ( बाल मित्र जिम), 5. विजय जाधव ( परब फिटनेस), 6. सम्राट ढाले ( सावरकर जिम).
90 किलोवरील गट : 1. निलेश दगडे ( परब फिटनेस), 2. प्रसाद वालांत ( बॉडी वर्कशॉप), 3. येशूप्रभू तलारी (हार्डकोअर जिम).
फिजीक स्पोर्टस महिला : 1. रेणूका मुदलियार (फॉरच्युन फिटनेस), 2. दिपाली ओगले (रिवाईंड जिम), 3. डॉ. मंजिरी भावसार (प्रो फिट), 4. निशरीन पारिख (इंटेन्स जिम), सिद्धी ठाकूर (संभाजी जिम), वीणा चौहान (वेट हाऊस जिम).
महिला शरीरसौष्ठव : 1. अमला ब्रम्हचारी ( फिटनेस वेअर हाऊस), 2. डॉ. माया राठोड (ग्रेस फिटनेस), 3. श्रद्धा ढोके (माँसाहेब जिम), 4. रिया कुमार (बॉडी वर्कशॉप).
पुरूष फिजीक स्पोर्टस् (170 सेमी) : 1. अरमान अन्सारी (मॉर्डन फिटनेस), 2. महेश गावडे (फॉरच्युन फिटनेस), 3. अविनाश जाधव (बाल मित्र जिम), 4. अनिकेत चव्हाण (एस.पी. फिटनेस), 5. विजय हापे (परब फिटनेस), 6. प्रसाद लाड (बॉडी वर्कशॉप).
पुरूष फिजीक स्पोर्टस् (170 सेमी) : 1. अतिक खान (फोर्ज फिटनेस), 2. अली अब्बास (एस.पी. फिटनेस), 3. प्रसाद तोडणकर (फ्लेक्स जिम), 4. स्वराज सिंग (आर.डी.एस स्ट्रेंथ), 5. संतोष पुजारी (फिटनेस प्लॅनेट), 6. अभिषेक पाडगावकर ( फॉरच्युन फिटनेस).
प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू : निलेश दगडे (परब फिटनेस), उत्कृष्ट पोझर : अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन),
उपविजेता : सुशील मुरकर (वीर सावरकर जिम)
स्पार्टन मुंबई श्री : रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप)