डोपिंगप्रकरणी रशियाला दणका; वाडाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:15 AM2019-12-10T03:15:34+5:302019-12-10T03:15:52+5:30
रशियाला २०२० तसेच २०२२ च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदी
लुसाने : डोपिंगप्रकरणी वारंवार चुकीचे आकडे सादर करीत दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून विश्व डोपिंग विरोधी एजन्सीने (वाडा) सोमवारी रशियाला मोठा दणका दिला. टोकियो आॅलिम्पिक २०२० तसेच बीजिंग हिवाळी आॅलिम्पिक २०२२ सह विश्वचषक स्पर्धेतही रशियाच्या खेळण्यावर बंदी घातली आहे.
वाडाने रशियावर एका डोपिंगविरोधी प्रयोगशाळेतील चुकीची आकडेवारी सादर केल्याचा आरोप लावला. याच कारणांमुळे या देशाला चार वर्षांसाठी खेळातील सहभागापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. वाडाच्या लुसाने येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
वाडा प्रमुख जेम्स फिट्झगेरॉल्ड म्हणाले,‘बंदीची शिफारस सर्वसंमतीने मान्य करण्यात आली. चार वर्षांपर्यंत रशियाच्या डोपिंगविरोधी एजन्सीने नियमांचे पालन न करता वाडाची फसवणूक केल्याचा निष्कर्ष कार्यसमितीने काढला आहे.’ या निर्णयाचा अर्थ असा की रशियाचे खेळाडू आता आगामी २०२० टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाच्या ध्वजाखाली खेळणार नसून
रशियाचे खेळाडू तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होतील. तथापि रशियाच्या सरकारद्वारे पुरस्कृत डोपिंग प्रकरणात आपला सहभाग सहभाग नव्हता, याचा पुरावा सहभागी खेळाडूंना सादर करावा लागणार आहे. याबाबत फिट्झगेरॉल्ड पुढे म्हणाले, ‘रशियाच्या डोपिंग कार्यक्रमात आपला सहभाग नव्हता, असे या खेळाडूंना सिद्ध करावे लागेल. ज्यांच्या डोप चाचणीच्या नमुन्यात अफरातफर झाली नव्हती, असे खेळाडू आॅलिम्पिकमध्ये तटस्थ ध्वजाखाली सहभागी होऊ श्कतील.’
रशियातील डोपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी वाडाने मॅक्लॉरेन समिती नेमली होती. या समितीने २०१६ ला दिलेल्या अहवालात २०११ ते २०१५ या काळात डोपिंगला रशियातील सरकारने प्रोत्साहन दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. (वृत्तसंस्था)