रशियाने इंग्लंडला बरोबरीत रोखले
By admin | Published: June 13, 2016 06:13 AM2016-06-13T06:13:34+5:302016-06-13T06:13:34+5:30
सामन्यावर नियंत्रण मिळवून विजयाच्या दिशेने कूच करणाऱ्या इंग्लंडला यूरो कप फुटबॉल स्पर्धेत सलामीलाच रशियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले
मार्सिली (फ्रान्स) : संपूर्ण सामन्यावर नियंत्रण मिळवून विजयाच्या दिशेने कूच करणाऱ्या इंग्लंडला यूरो कप फुटबॉल स्पर्धेत सलामीलाच रशियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. स्टॉपेज टाइममध्ये कर्णधार वैसिली बेरेजुस्की याने केलेल्या निर्णायक गोलमुळे इंग्लंडच्या विजयी सलामीचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याचवेळी अन्य सामन्यात वेल्सने स्लोवाकियाचे कडवे आव्हान २-१ असे परतावून विजयी कूच केली.
रशियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडची विजयाकडे दमदार कूच झाली होती. मात्र, अखेरच्या ९०व्या मिनिटामध्येच (स्टॉपेज टाइम) त्यांना जबर धक्का बसला. वैसिली याने यावेळी अप्रतिम गोल करताना इंग्लंड चाहत्यांना अनपेक्षितपणे बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी राहिल्यानंतर एरिक डिएर याने ७३व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला शानदार आघाडी मिळवून दिली.
यावेळी इंग्लंडने कोणताही अधिक धोका न पत्करता बचावावर अधिक भर देत रशियाला रोखण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडने भक्कम बचाव करताना अखेरपर्यंत १-० अशी आघाडी कायम राखली होती. मात्र, सामन्यातील अखेरच्या मिनिटाला त्यांच्या हातातील विजय हिसकावण्यात रशियाला यश आले. यावेळी कर्णधार वैसिली याने अप्रतिम हेडर करताना इंग्लंडचा गोलरक्षक जो हार्टला चकवून चेंडूला अचूकपणे गोलजाळ्यात धाडत रशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
त्याचवेळी ‘ब’ गटात झालेल्या चुरशीच्या सामन्यात वेल्सने आश्वासक सुरुवात करताना स्लोवाकियाचे कडवे आव्हान २-१ असे परतावण्यात यश मिळवले. गैरेथे बेल याने १०व्या मिनिटाला वेगवान गोल करताना वेल्सला आघाडीवर नेले.
>स्पर्धेला हिंसक रूप...
इंग्लंड विरुद्ध रशिया सामन्यादरम्यान दोन्ही देशांचे पाठीराखे एकमेकांविरुद्ध भिडल्याने यावेळी स्पर्धेला हिंसक रूप आले. यावेळी दोन्ही देशांच्या समर्थकांनी एकमेकांवर बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या, तर या जमावावर नियंत्रण राखण्यासाठी पोलिसांनी यावेळी अश्रुधुराचे गोळेही सोडले. या हिंसाचारामध्ये इंग्लंडच्या एका समर्थकाची स्थिती गंभीर असून कमीत कमी ३४ अन्य समर्थक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड - रशिया सामना बरोबरीत सुटल्यानंतर रशिया समर्थकांनी इंग्लंडच्या लाइनमध्ये प्रवेश केला आणि दोन्ही गटांत मारामारी सुरू झाली.
युएफाचा इशारा
इंग्लंड आणि फ्रान्सच्या चाहत्यांनी आपले हिंसक वर्तन बंद नाही केल्यास या दोन्ही संघांना युरो चषक २0१६च्या स्पर्धेतून बाहेर करण्यात येईल, असा इशारा युनियन आॅफ युरोपियन फुटबॉल असोशिएशनने दिला आहे.
>जर्मनीला ‘विराट’ पाठिंबा...
युरो कपला सुरुवात होताच जगभर फुटबॉल फिव्हर चढला असतानाच भारताचा कसोटी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीही त्यात मागे नसून त्याने आपले फुटबॉलप्रेम जाहीर करतानाच आपला पाठिंबा जर्मनीला दर्शविला आहे. आपल्या आवडत्या जर्मनी संघाची जर्सी परिधान केलेला फोटो नुकताच कोहलीने सोशल नेटवर्कवर पोस्ट केला असून, ‘‘मी यूरो कप २०१६ साठी खूप उत्साहित आहे. मी जर्मनीला पाठिंबा देत आहे. तुमची आवडती टीम कोणती आहे?’’ असा मेसेज कोहलीने टाकला आहे. दरम्यान, जर्मनीने रविवारी आपला सलामीचा सामना युक्रेनविरुद्ध खेळला असून जर्मनी संघाचे अधिकृत टिष्ट्वटर हँडलसहीत स्टार मिडफिल्डर टोनी क्रूझनेदेखील संघाला समर्थन दिल्याबद्दल कोहलीचे आभार मानले.