"सचिन, लक्ष्मण आणि गांगुलीने कुंबळेशी साधी चर्चाही केली नव्हती"
By admin | Published: June 27, 2017 11:19 AM2017-06-27T11:19:08+5:302017-06-27T11:21:40+5:30
सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप चर्चा थांबलेली नाही. रोज या प्रकरणी काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. हा संपुर्ण वाद समोर आला तेव्हा क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे आणि कोहलीसोबत चर्चा करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती. त्यांनी फक्त विराट कोहलीशी चर्चा करत संपुर्ण वाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
बीसीसीआयच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ""कोहलीशी चर्चा केल्यानंतर सल्लागार समितीने सर्व काही ठीक असून ही काही मोठी समस्या नाही, तसंच संघाचं प्रदर्शनही चांगलं असल्याने कुंबळेला हटवण्याची गरज नाही असा निष्कर्ष काढला होता"". कुंबळेने गेल्या एक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याने सल्लागार समितीने कुंबळेला भेटून त्याची बाजू जाणून घेण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. आणि कदाचित याच गोष्टीमुळे विराट कोहली नाराज झाला होता. चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीने लंडनमध्ये बीसीसीआय अधिका-यांशी यासंबंधी चर्चा केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""बोर्डाला आपला निर्णय कळवल्यानंतर सल्लागार समिती या बैठकीत सहभागी झाली नाही. या बैठकीत कुंबळे आणि कोहली यांच्या व्यतिरिक्त बीसीसीआय अधिकारी अमिताभ चौधरी, राहुल जोहरी आणि एमवी श्रीधर उपस्थित होते"". यानंतर कुंबळेकडे संघासोबत वेस्ट इंडिज दौ-यावर जाण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्याने तात्काळ राजीनामा देऊन टाकला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""45 मिनिटांच्या या बैठकीत कोहलीच जास्त वेळ बोलत होता. त्याने आपल्याला कुंबळेसोबत काम करण्यावर तसंच त्याच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचं सांगितलं. हा कुंबळेसारख्या महान खेळाडूचा अपमान होता. त्यामुळेच कदाचित आपला कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आधीच कुंबळेने राजीनामा देऊन टाकला. सोबतच वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जाण्यासही नकार दिला"".