तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! विक्रमी पराक्रम करणाऱ्या अमनसाठी सचिनची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:32 PM2024-08-10T14:32:52+5:302024-08-10T14:35:51+5:30

मानाची स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय पैलवानासाठी खास  शुभेच्छा

Sachin Tendulkar Congratulations Aman Sehrawat On Becoming India's Youngest Olympic Medal Winner |  तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! विक्रमी पराक्रम करणाऱ्या अमनसाठी सचिनची खास पोस्ट

 तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! विक्रमी पराक्रम करणाऱ्या अमनसाठी सचिनची खास पोस्ट

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणाचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताच्या खात्यात सहाव्या पदकाची भर घातली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी  ऑलिम्पिक पदक जिंकून अमन याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या दैदिप्यमान कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यानेही मानाची स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय पैलवानासाठी खास  शुभेच्छा दिल्या आहेत. मास्टर ब्लास्टरनं आपल्या पोस्टमध्ये अमन सेहरावत याच्या विक्रमाचा तर उल्लेख केला आहेच. पण याशिवाय भावनिक जोड देणारे शब्दही लक्षवेधून घेणारे आहेत.  

विक्रमी कामगिरीसह गाजवली जगातील मानाची स्पर्धा 

अमन सेहरावत याने ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक कमावले आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्वात कमी वयात जगातील मानाची स्पर्धा गाजवण्याचा पराक्रम या पठ्ठ्यानं करून दाखवला आहे. याआधी भारताकडून सर्वात कमी वयात ऑलिम्पिक पदक कमावण्याचा विक्रम हा भारतीय बॅटमिंटन स्टार पीव्ही सिंधू हिच्या नावे होता. तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत  21 वर्षे 1 महिना आणि 14 दिवस वय असताना रौप्य पदकाची कमाई केली होती. आता अमन याने 21 वर्षे 24 दिवस वयात कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

 हा विजय फक्त तुझा नाही,  आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो!  

क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकरनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) युवा पैलवानाला खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलंय की, 21 व्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून युवा खेळाडू झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. हा विजय फक्त तुझा नाही. हा भारतीय कुस्तीचा विजय आहे. प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान वाटतो. 

 तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील, सचिनच्या पोस्टमधील ओढ 

वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमन सेहरावतनं आई-वडीलांना गमावलं. 2013 मध्ये वडिलांनीच त्याला छत्रसाल स्टेडियम येथील प्रसिद्ध कुस्ती आखाड्यात प्रवेश मिळवून दिला होता. लेकाच यश पाहायला आज आई वडील नाहीत. सचिनने ही भावनिक गोष्ट खास शब्दांत मांडली आहे. आई वडील स्वर्गातून तुझे यश पाहात असतील. त्यांनाही तुझं कौतुक वाटत असेल, असा उल्लेख विक्रमादित्याने ऑलिम्पिक विक्रमवीरासाठी केल्याचे दिसते.

पदकासह भारतीय कुस्तीला मिळाली भविष्याची आस


अमन सेहरावत याने पहिल्या वहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाल्यावर सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. अनुभवाचा अभाव आणि तगडे प्रतिस्पर्धी असतानाही त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध करून दाखवली. भविष्यात त्याच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.   

Web Title: Sachin Tendulkar Congratulations Aman Sehrawat On Becoming India's Youngest Olympic Medal Winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.