सचिन तेंडुलकरने केली पुजारा, उमेशची प्रशंसा
By Admin | Published: April 1, 2017 01:07 AM2017-04-01T01:07:12+5:302017-04-01T01:07:12+5:30
आक्रमक फलंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय संघात चेतेश्वर पुजारा संयमी फलंदाजी करीत मोठी खेळी करतो
मुंबई : आक्रमक फलंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय संघात चेतेश्वर पुजारा संयमी फलंदाजी करीत मोठी खेळी करतो. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पुजाराची प्रशंसा करताना त्याला ‘मूक योद्धा’ संबोधले आहे.
धरमशाला येथे आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान पुजाराने एका कसोटी मोसमात सर्वाधिक धावा फटकाविण्याचा गौतम गंभीरचा आठ वर्षे जुना विक्रम मोडला.
सचिन म्हणाला, ‘पुजारा मूक योद्धा आहे. शिस्त व एकाग्रता हे त्याचे महत्त्वाचे गुण आहे. मी त्याला जवळून बघितले असून, त्याच्या गुणांमुळे प्रभावित झालो आहे. माझ्या मते हा खेळाडू प्रदीर्घ काळ खेळेल.’सचिनने मायदेशातील प्रदीर्घ कालावधीच्या मोसमात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रशंसा केली. सचिन म्हणाला, ‘सलग १३ कसोटी सामने आमच्या कारकिर्दीत खेळल्याचे मला आठवत नाही. उमेशसारख्या खेळाडूने त्यात १२ कसोटी सामने खेळले. एका वेगवान गोलंदाजासाठी ही कडवी परीक्षा आहे. तो जेवढी अधिक गोलंदाजी करेल तेवढी त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा दिसेल. त्याने मोसमाच्या अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या डावात गोलंदाजीतील सर्वोत्तम स्पेल केल्याचे आपल्याला मानता येईल. ’