सचिनला खालच्या क्रमावर खेळवू इच्छित होतो!
By admin | Published: February 14, 2015 12:28 AM2015-02-14T00:28:59+5:302015-02-14T00:28:59+5:30
वेस्ट इंडीजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकर याला खालच्या स्थानावर खेळण्याचा आग्रह
मेलबोर्न : वेस्ट इंडीजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकर याला खालच्या स्थानावर खेळण्याचा आग्रह करताच आम्हा दोघांमध्ये खटके उडले. संबंधही दुरावले, असे स्पष्टीकरण टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल यांनी दिले.
सचिनने ‘प्लेर्इंग इट माय वे’ या आत्मकथेत आॅस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधारावर हल्लाबोल करीत ‘रिंगमास्टर’ संबोधले होते. काही महिन्यानंतर ६६ वर्षांच्या चॅपेल यांनी स्पष्टीकरण दिले. ‘फॉक्स स्पोटर््स’च्या ‘क्रिकेट लिजेंड्स’ या कार्यक्रमात चॅपेल म्हणाले, ‘सचिनला मी खालच्या क्रमावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला तो तयारही झाला. पण, नंतर मतपरिवर्तन करीत नकार दिला होता. संघाला असलेल्या गरजेनुसार सचिन वागेल, असे मला वाटले होते. पण, सचिनला जे वाटायचे, तेच तो करायचा.’ २००७च्या विश्वचषकात भारत पहिल्याच फेरीत बाहेर झाला, हे विशेष.
डावाची सुरुवात करणे ही सचिनची पसंती होती. पण, विंडीजमध्ये सचिनने खालच्या स्थानावर खेळण्याची संघाला गरज होती. वरच्या स्थानावर खेळणारे अनेक जण संघात होते. पण, खालच्या स्थानावर खेळणारे कुणी नव्हते, ही समस्याच होती. सचिन सुरुवातीला तयार झाला. नंतर मात्र माझ्याकडून असे होणार नाही, असे म्हणाला. मी खालच्या क्रमावर खेळण्यास त्याला भाग पाडले. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचे चॅपेल यांनी नमूद केले.
सचिनने स्वत:च्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ‘विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी चॅपेल माझ्या घरी भेटायला आले. राहुल द्रविड याच्याकडून कर्णधारपदाची सूत्रे तू घे, असा त्यांनी सल्ला दिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो.’चॅपेल यांनी माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव न घेता त्याच्यावरही शरसंधान साधले. ‘टीम इंडिया जगातील सर्वश्रेष्ठ संघ बनावा, यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून स्वत:चे स्थान टिकविणे भारतीय क्रिकेटमधील मोठी समस्या आहे,’ या शब्दांत चॅपेल यांनी गांगुलीला धारेवर धरले. ते पुढे म्हणाले, ‘सौरव संघात स्थान टिकविण्यात धन्यता मानायचा. मी त्याला सलग चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन द्यायचो. (वृत्तसंस्था)