सचिनच्या बिलियन ड्रीम्सने पाच दिवसांत कमावले 35 कोटी
By admin | Published: May 31, 2017 10:00 PM2017-05-31T22:00:49+5:302017-05-31T22:00:49+5:30
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स"ने पहिल्या दिवशी 8. 40 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग मिळवली होती.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स"ने पहिल्या दिवशी 8. 40 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग मिळवली होती. शुक्रवारी 8. 40 कोटी, शनिवारी 9.20 आणि रविवारी 10.25 कोटींची कमाई करत चांगली सुरुवात केली. पण सोमवारी आणि मंगळवारी चित्रपटाचा व्यवसाय घसरला. सोमवारी चित्रपटाने 4. 20 कोटी तर मंगळवारी 3.50 कोटी रुपये कमावले. या सिनेमाने भारतात सर्व भाषांमध्ये मिळून पाच दिवसांत 35. 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सचिनच्या देशभरातील चाहत्यांना डोळयासमोर ठेवून वेगवेगळया भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सचिनने मुंबईत सेलिब्रिटींसाठी चित्रपटाचा विशेष स्क्रिनिंग ठेवले होते. अमिताभ, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन चित्रपटाच्या स्क्रिंनिगला हजर होते. "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" पाहून अभिमान वाटला अशा शब्दात अमिताभ यांनी चित्रपटाचे कौतुक केले. सचिन फक्त एक व्यक्ती नसून त्या भारताच्या भावना आहे असे मत अभिषेक बच्चनने व्यक्त केले.
सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे. ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत. ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे. सचिनच्या जीवनचरित्रातून राज्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल या हेतून हा चित्रपट टॅक्स फ्रीचा निर्णय घेण्यात आला असे आसामचे अर्थमंत्री शशीभूषण बेहेरा यांनी सांगितले.
या चित्रपटात सचिनचा बालपणापासून ते क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. गेल्या वर्षी धोनीच्या आत्मकथेवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. आता सचिनचा आत्मकथेवर आधारीत चित्रपटाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.