मि.वर्ल्डमध्ये सागर कातुर्डेने जिंकले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:12 PM2019-11-20T16:12:39+5:302019-11-20T16:17:16+5:30
महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी, वीरेश धोत्रेही पदकविजेता
मुंबई : दक्षिण कोरियाचे जेजू आयलंड भारताच्याशरीरसौष्ठवपटूंनी गाजवले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या आयकर खात्यात असलेल्या सागर कातुर्डेने 75 किलो वजनीगटात सोनेरी यश मिळवित मि.वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे आपले स्वप्न साकारले. सागरसह महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या दोघांनीही रौप्य जिंकून पदकविजेती कामगिरी केली. भारतासाठी संस्मरणीय ठरलेल्या या स्पर्धेत दहापैकी सात गटात सुवर्ण यश संपादल्यामुळे जन गण मनचे सूर निनादले.
जेजू आयलंडवर झालेली 11 वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा भारतासाठी आजवरची सर्वाधिक यशस्वी ठरली. त्यातच महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंनी धम्माल केली. सहावेळा भारत श्री तसेच महाराष्ट्र श्री आणि मुंबई श्रीचा बहुमान मिळविणाऱया सागर कातुर्डेने 75 किलो वजनी गटात कमाल केली. त्याने आपल्याच भारताच्या जयप्रकाश आणि सतीशकुमारवर मात करीत सोनेरी यश मिळविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच यश होय. 100 किलो वजनीगटात रोहित शेट्टी थोडक्यात अपयशी ठरला. या गटात भारताचाच दयानंद सिंग अव्वल आला तर रोहितला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय शरीरसौष्ठवात गेली दोन दशके दमदार कामगिरी करणाऱ्या वीरेश धोत्रेने मास्टर स्पर्धेत रौप्य पदक जिंकून आपले अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले.
भारतासाठी अभूतपूर्व यश देणारी स्पर्धा ठरलेल्या मि.वर्ल्डमध्ये 55, 60 आणि 65 किलो या तिन्ही वजनीगटात एकही सुवर्ण जिंकता आले नाही. मात्र पुढील सातही गटात भारताच्या शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला. हा आजवरचा एक विक्रमच आहे. भारताकडून राजकिशोर नायक, सागर कातुर्डे, बॉबी सिंग, मोहन सुब्रमण्यम, चिथरेश नटेशन, दयानंद सिंग आणि अनुज कुमार यांनी गटविजेतेपद पटकावले. भारताच्या यशानिमित्त जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.
वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निकाल
पुरूष शरीरसौष्ठव 55 किलो : 1. थुय कहान्ह खुओ (व्हिएतनाम), 2. रामामूर्ती मुरूगेसन (भारत), 3. मोहम्मद मुसा (मालदिव), 4. कुंदन गोपे (भारत), 5. लैशराम नेता सिंग (भारत).
60 किलो : 1. आन्ह थाँग ( व्हिएतनाम), 2. इतरंगसी जक्कावत (थायलंड), 3. तुन तुन अंग (म्यानमार), 4. गौरव भंडारी ( भारत), 5. अब्दुला मलवर्न ( मलेशिया)
65 किलो : 1. तुन मिन (म्यानमार), 2. तियान्ह शुई (चीन), 3. पानरुयांग सुरासक ( थायलंड), 4. ट्रन होआंग (व्हिएतनाम), 5. कोटनंदारामण मनिवेधन (भारत)
70 किलो : 1. राजशेखर नायक (भारत), 2.रामकृष्ण थुंडीपरंबिल (भारत), 3. थाई डुआंग लॅम (व्हिएतनाम), 4. हरीबाबू कृष्णमूर्ती ( भारत), 5. आनक बुडा (मलेशिया).
75 किलो : 1. सागर कातुर्डे (भारत), 2. जयप्रकाश वेंकटेशन (भारत), 3. सतिशकुमार रामचंद्रन (भारत), 4. आदम झमरूल (मलेशिया), 5. प्राथत देतनारोंग (मलेशिया).
80 किलो : 1. ए. बॉबी सिंग (भारत), 2. सर्बो सिंग (भारत), 3. प्रतीप पानुपोंग ( थायलंड), 4. सिफा (व्हिएतनाम), 5. माथवांगसंग सकोर्ण (थायलंड)
85 किलो : 1. मोहन सुब्रमण्यम (भारत), 2. कार्थिक इलुमलाई (भारत), 3. देवा सिंग (भारत), 4. निमकुनचॉन सित्तिपाँग (थायलंड), 5. सर्वानन मणी (भारत).
90 किलो : 1. चिथरेश नतेशन ( भारत), 2. सेंथिल कुमारन (भारत), 3. राजेंद्रन मणी (भारत), 4. डॅनिल सियेचनिकोव्ह (उझबेकिस्तान), 5. राहुल बिश्त (भारत).
100 किलो : 1. दयानंद सिंग (भारत), 2. रोहित शेट्टी (भारत), 3. उमरजकोव्ह पॅवेल (उझबेकिस्तान),4. कुओल लॅम (व्हिएतनाम), 5. इव्हान अफनासयेव्ह (कझाकस्तान).
100 किलोवरील : 1. अनुजकुमार तलियन (भारत), 2. वुत्तीकान कित्तीसक (थायलंड), 3. फझल सय्यद (पाकिस्तान), 4. बी. पूर्णचंद्रन (भारत), 5. किरणकुमार संजीवा (भारत).