साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

By admin | Published: August 24, 2016 04:17 AM2016-08-24T04:17:19+5:302016-08-24T04:17:19+5:30

रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

Saha, Ashwin series honors | साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

Next


पोर्ट आॅफ स्पेन : रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. यष्टिरक्षक साहा याने तळाच्या फळीत चांगली फलंदाजी केली.
कोहली म्हणाला, ‘आमच्यासाठी हा चांगला दौरा ठरला. आम्ही काही विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. तळाच्या फळीत खेळताना रिद्धिमान साहाची फलंदाजी व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने दिलेले योगदान माझ्या दृष्टीने या मालिकेतील सकारात्मक बाब आहे.’
कोहली म्हणाला, ‘आम्ही कामगिरीत आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत. भविष्यातही त्यात खंड पडणार नाही, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत. तळाच्या फळीकडून उल्लेखनीय योगदान मिळाले म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये संघ यशस्वी ठरतात. त्यामुळे या विभागात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.’
मालिकेत चांगल्या निकालाची
अपेक्षा होती : अश्विन
रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकताना १७ बळीही घेतले. अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विनला या मालिकेत यापेक्षा सरस निकालाची अपेक्षा होती.
अश्विनने या मालिकेत दोन शतकाच्या मदतीने २३५ धावा फटकावल्या. डावात दोनदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेताना एकूण १७ विकेट घेतल्या. अश्विन कसोटी मालिकेत सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामनावीर पुरस्काराच्या शर्यतीत त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. अश्विन म्हणाला, ‘यासाठी विंडीजला थोडे श्रेय द्यावे लागले. भारताची आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यामुळे मला शतक झळकावण्याची संधी व वेळ मिळाला. अनेक संघातील आघाडीचे खेळाडू शतके झळकावतात.’
>एका कसोटीने आकलन होणार नाही
जर पाकिस्तान जिंकला नसता आणि आमची यापूर्वीची लढत अनिर्णीत संपली असती तर क्रमवारीत फरक पडला असता. हे अल्प कालावधीसाठी आहे, याची कल्पना आहे. क्रमवारीत चांगली चुरस आहे. संघ म्हणून या मोसमानंतर आकलन करणार आहोत. केवळ एका कसोटीवरून संघाचे आकलन करता येणार नाही. - कोहली
>सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी स्वप्नवत
‘मी कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. वैयक्तिक विचार करता शतकाच्या तुलनेत मला पाच बळी घेण्याचा आनंद अधिक मिळतो. कोलकाता आणि सेंट ल्युसिया येथे झळकावलेली शतके माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. मला या कामगिरीची अपेक्षा होती. दोन शतके ठोकण्यात यशस्वी ठरेल असे वाटत नसले तरी फलंदाजीमध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, याची कल्पना नव्हती. मायदेशात दीड महिना कसून मेहनत घेतली. त्याचा लाभ झाला. - अश्विन

Web Title: Saha, Ashwin series honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.