सिंधूची खासगी ट्रेनर, फिजिओची मागणी मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:31 AM2020-12-19T02:31:50+5:302020-12-19T02:32:13+5:30
साईकडे केली होती विनंती
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पीव्ही सिंधूची पुढील वर्षी जानेवारीमध्ये तीन स्पर्धांसाठी खासगी फिजिओ व ट्रेनरची मागणी मान्य केली आहे.
विश्व चॅम्पियन २६ वर्षीय सिंधू ‘टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम ’ कोअर समूहाचा भाग आहे. ती कोविड -१९ मुळे खेळात आलेल्या अडथळ्यानंतर जानेवारीमध्ये स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करणार आहे.
साईने स्पष्ट केले की, ‘सरकाने तीन स्पर्धांसाठी फिजिओ व फिटनेस ट्रेनर देण्याची तिची मागणी मान्य केली आहे. या तीन स्पर्धा योनेक्स थायलंड ओपन (जानेवारी १२-१७), टोयोटा थायलंड ओपन (१९-२४ जानेवारी) आणि बँकॉकमध्ये २७ ते ३१ जानेवारीपर्यंत खेळल्या जाणाऱ्या विश्व टूर फायनल्स (क्वाॅलिफिकेशन प्राप्त केले तर) आहेत.
साईने पुढे म्हटले की, ‘या कालावधीत फिजिओ व ट्रेनरचा खर्च जवळजवळ ८.२५ लाख रुपये असेल आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे.’ हैदराबादची खेळाडू सध्या लंडनमध्ये ‘गॅटोरेड स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट रेबेका रँडेला यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसवर मेहनत घेत आहे.
त्याचसोबत सिंधू बॅडमिंटन इंग्लंडचे टॉबी पेंटी व राजीव ऑपेश यांच्यासोबत नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करीत आहे. तिने ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. बीडब्ल्यूएफ (विश्व बॅडमिंटन महासंघ) लॉजिस्टिक मुद्यांच्या आधारावर २०२० विश्व टूरसाठी नवा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात आशियाई गटातील दोन मोठ्या स्पर्धांव्यतिरिक्त विश्व टूर फायनल्स स्पर्धा जानेवारीमध्ये खेळली जाणार आहे.