दिव्यांग खेळाडूंसाठी साई केंद्र सुरू होणार, करिअर म्हणूनच खेळाकडे पाहा, आयुष्याला शिस्त लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:34 AM2017-09-19T03:34:45+5:302017-09-19T03:34:47+5:30
दिव्यांग खेळाडूंसाठी देशात पहिले साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्रात दिव्यांगांसाठी लागणा-या सर्व सुविधा असतील. गुजरातच्या गांधीनगर शहरात सध्याच्या साई केंद्राचे रूपांतर पॅरा खेळाडूंच्या तयारीसाठी करण्यात येत आहे.
किशोर बागडे ।
नागपूर : दिव्यांग खेळाडूंसाठी देशात पहिले साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्रात दिव्यांगांसाठी लागणा-या सर्व सुविधा असतील. गुजरातच्या गांधीनगर शहरात सध्याच्या साई केंद्राचे रूपांतर पॅरा खेळाडूंच्या तयारीसाठी करण्यात येत आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया याच्या आग्रहानंतर केंद्र शासनाने वेगाने पावले उचलली. या केंद्रात दिव्यांग खेळाडूंसाठी विविध खेळांचा सराव आणि निवासव्यवस्था असेल. याशिवाय आंतरराष्टÑीय स्पर्धांची तयारी, शिबिरे याच ठिकाणी आयोजिली जातील. झझारिया याने अलीकडे दिव्यांगांसाठी एकही साई केंद्र नसल्याची खंत व्यक्त केली होती. माजी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तातडीने दखल घेत साई केंद्राचे रूपांतर दिव्यांग खेळाडूंसाठी करण्याचे आदेश दिल्याची माहिती स्वत: देवेंद्रने नागपूरभेटीत ‘लोकमत’ला दिली. तत्पूर्वी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करताना देवेंद्र म्हणाला, ‘‘आॅलिम्पिक पदक हे खेळाडूंचे स्वप्न असले तरी सर्वांना मिळत नाही. यश आणि लोकप्रियतेसोबतच जीवनाला शिस्त लावण्याची ताकद खेळांमध्ये आहे. आपल्याकडे अमुक गोष्ट नाही, म्हणून रडत बसण्यापेक्षा विपरीत परिस्थितीत संघर्ष केल्यास यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.’’
सध्याचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड स्वत: आॅलिम्पिक रौप्यविजेते नेमबाज राहिले आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या वेळी देवेंद्रने खेळाडूंना काय हवे, यावर चर्चा केली. त्यांनीही साई केंद्र अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्याचे झझारियाने सांगितले. भारतीय पॅरालिम्पिक (पीसीआय) समितीवरील बंदीमुळे खेळाडू भरडला जात असून खेळाडूंना देशात आणि देशाबाहेरही मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. खुर्चीच्या भांडणात अडकलेल्यांना घरी बसवायला हवे. माजी पॅरालिम्पिकपटूंना संघटनेत स्थान मिळाल्यास खेळाचे हित साधले जाईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. पुढील लक्ष्य काय, असे विचारताच ३६ वर्षांचा देवेंद्र म्हणाला, ‘‘मी सध्या पाच तास (फिटनेस) सराव करतो. आशियाडची तयारी सुरू करणार आहे. २०२० च्या टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये कामगिरीत सातत्य राखून देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे.’’ ‘आॅफर’आल्यास राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे काय, असे विचारताच राजस्थानातील चुरू येथे वास्तव्य करणारा देवेंद्र हसून म्हणाला, ‘‘राजकारण वाईट नाही. संधी मिळाल्यास सेवाभाव म्हणून काम करण्याची इच्छा आहे. दिव्यांगांच्या समस्या मांडता येतील. पण सध्या खेळात रमलो आहे.’’
>वयाच्या आठव्या वर्षी फळे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या देवेंद्रचा डावा हात विजेच्या जिवंत तारेला लागला. डॉक्टरांनी हात कापल्याने वडील रामसिंग आणि आई जीवनीदेवी यांच्यावर आभाळ कोसळले. मुलाला अधिकारी बनविण्याचे स्वप्न जोपासणाºया आई-वडिलांना देवेंद्रने काही करून दाखविण्याचा शब्द दिला. शाळेतील क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात भालाफेकीत कमाल करणाºया देवेंद्रवर कोच आर. डी. सिंग यांची नजर गेली. त्यांनी त्याला घडविले.भाला विकत घेण्यासाठी पैसे नव्हत, तेव्हा एका परदेशी भारतीयाने त्याची मदत केली. मग देवेंद्रने स्वत:चा शब्द खरा ठरविला. २००४ (अथेन्स) आणि २०१६ (रिओ) पॅरालिम्पिकचे सुवर्ण जिंकणाºया देवेंद्रने ६३.९३ मीटर भालाफेकीचा नवा विश्वविक्रमही नोंदविला आहे.
यंदा ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘पॅरालिम्पियन’ला प्रथमच मिळाला हे विशेष. पद्मश्री, अर्जुन आणि खेलरत्न असे तिन्ही पुरस्कार स्वत:च्या शिरपेचात खोवणाºया देवेंद्रकडे आज दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार आंतरराष्टÑीय पदके आहेत. सध्या तो साई केंद्रात समन्वयकपदावर कार्यरत आहे.