सायना अजिंक्य
By admin | Published: January 23, 2017 12:34 AM2017-01-23T00:34:08+5:302017-01-23T00:34:08+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि मलेशिया मास्टर्स
सरावाक : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाचे हे पहिलेच जेतेपद आहे.
सायनाने आज अंतिम फेरीत थायलंडच्या १८ वर्षीय पोर्नवावी चोचुवोंगची झुंज २२-२०, २२-२० ने मोडून काढली. लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने या लढतीत ४६ मिनिटांमध्ये विजय साकारला. सायनाचे कारकिर्दीतील २३ वे आणि गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपननंतरचे पहिले विजेतेपद आहे. गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीने सतावल्यानंतर जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सायनासाठी हे जेतेपद मनोधैर्य उंचावण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सायना प्रथमच थायलंडच्या या खेळाडूविरुद्ध खेळली. थायलंडच्या खेळाडूने सुरुवातीलाच चार गुण वसूल करीत सायनाला बॅकफूटवर पाठविले. चोचुवोंगने वर्चस्व गाजवताना ब्रेकपर्यंत ११-५ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर पुनरागमन करीत १०-१३ अशी पिछाडी भरून काढली आणि त्यानंतर १९-१९ अशी बरोबरी साधली. चोचुवोंग दडपणाखाली आल्याचा लाभ घेत अनुभवी सायनाने पहिला गेम जिंकत १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्येही चोचुवोंगने चांगली सुरुवात करताना ३-० अशी आघाडी घेतली. पण सायनाने पुनरागमन करीत ७-५ अशी आघाडी घेत वर्चस्व निर्माण केले. थायलंडच्या खेळाडूने ८-८ आणि ११-११ अशी बरोबरी साधत तुल्यबळ लढत दिली. सायनाने थोडी आघाडी कायम राखली, पण त्यानंतर चार मॅचपॉर्इंट गमावले. त्यामुळे चोचुवोंग ही २०-२० अशी बरोबरी साधण्यात यशस्वी ठरली. सायनाने त्यानंतर सलग गुण वसूल करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
(वृत्तसंस्था)