सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: April 30, 2016 10:01 PM2016-04-30T22:01:13+5:302016-04-30T22:01:13+5:30
जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाची खेळाडू भारताची सायना नेहवाल शनिवारी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या वांग
वुहान : जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाची खेळाडू भारताची सायना नेहवाल शनिवारी आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या वांग यिहानविरुद्धच्या लढतीत पराभूत झाली. तिच्या या पराभवाने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
स्पर्धेत पाचव्या मानांकित सायनाला सेमी फायनलमध्ये सहाव्या मानांकित चीनच्या वांग यिहानविरुद्ध ४१ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१६ अशा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाबरोबरच सायनाचे जागतिक क्रमवारीतील सहाव्या रँकिंगच्या यिहानविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड ४-११ असे झाले आहे.
पायाच्या घोट्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची आशा असणाऱ्या सायनाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावले; परंतु तिला पराभव पत्करावा लागला. याआधी सायनाला स्वीस ग्रांप्री गोल्ड, इंडिया सुपर सिरीज आणि मलेशिया सुपर सिरीज प्रीमियर ओपनमध्येदेखील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. सायनाने या लढतीत वांगविरुद्ध ३-० अशी आघाडी घेतली होती आणि ती ९-६ अशी वाढवली होती; परंतु प्रतिस्पर्धी चिनी खेळाडूने मुसंडी मारताना मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या गेममध्ये वांगचे वर्चस्व राहिले व तिने सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली आणि ती
पुढेही कायम ठेवली. त्याचबरोबर भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.(वृत्तसंस्था)