सायना फायनलमध्ये
By admin | Published: June 12, 2016 06:17 AM2016-06-12T06:17:12+5:302016-06-12T06:17:12+5:30
भारतीय स्टार सायना नेहवाल हिने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली चीनची विहान वांग हिचा पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपन
सिडनी : भारतीय स्टार सायना नेहवाल हिने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली चीनची विहान वांग हिचा पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. फायनल जिंकल्यास सायनाचे या मोसमातील हे पहिलेच जेतेपद ठरणार आहे.
सायनाची कामगिरी रिओ आॅलिम्पिकआधी उत्साहात भर घालणारी असून, याद्वारे तिने आपण आॅलिम्पिकसाठी फिट असल्याचे संकेतही दिले. २०११ ची विश्व चॅम्पियन आणि २०१२ ची आॅलिम्पिक रौप्य विजेती विहानला सायनाने अर्ध्या तासात २१-८, २१-१२ ने पराभूत केले. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सायनाला अंतिम लढतीत चीनची १२ व्या क्रमांकावरील खेळाडू सून यू हिच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे. सून यू हिने दुसऱ्या उपांत्य सामन्यात आपलीच सहकारी ली जुईरुई हिला नमविले.
सायनाने २०१४ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. तिचा सूनविरुद्ध विजयाचा विक्रम ५-१ असा आहे. सूनने २०१३ च्या चायना ओपनमध्ये सायनाला पराभूत केले होते.
पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात भारताचा एकमेव खेळाडू किदाम्बी श्रीकांत कोर्टवर कायम होता; पण त्याला उपांत्य सामन्यात डेन्मार्कचा हेन्स ख्रिस्टियनविटिंग्स याने परभवाचा धक्का दिला. ४३ मिनिटे चाललेला हा सामना श्रीकांतने २०-२२, १३-२१ अशा फरकाने गमावला. (वृत्तसंस्था)