सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू सज्ज
By Admin | Published: March 28, 2017 01:20 AM2017-03-28T01:20:38+5:302017-03-28T01:20:38+5:30
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू हे भारताचे स्टार शटलर्स आगामी इंडिया ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाले असून
नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू हे भारताचे स्टार शटलर्स आगामी इंडिया ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाले असून, दोघींचेही लक्ष्य विजेतेपदाचे असल्याने या स्पर्धेत बॅडमिंटनप्रेमींना थरारक खेळ पाहण्याची संधी असेल. सातवे सत्र असलेल्या या स्पर्धेत या दोघी आॅलिम्पिक पदकविजेत्या खेळाडू संभाव्य विजेत्या आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी हीच स्पर्धा जिंकून सायनाने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळविले होते.
गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या सायनाने सांगितले, ‘‘दिल्ली नेहमीच माझ्यासाठी विशेष राहिली आहे. येथेच मी राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर २०१५मध्ये याच स्पर्धेत बाजी मारून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. ’’
सायना पुढे म्हणाली, ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडू आव्हानात्मक झाले आहेत; पण असे असले तरी सध्या माझा खेळ चांगला होत आहे. आॅल इंग्लंड स्पर्धेतही बरोबरीचा खेळ झाला होता. मी माझा सर्वोत्तम खेळ करेन आणि आशा आहे, की निकाल चांगला लागेल.’’ सायना आणि सिंधू दोघीही आॅल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या होत्या. परंतु, इंडिया ओपनच्या स्पर्धेत या दोघीही उपांत्यपूर्व फेरीत एकमेकींविरुद्ध खेळू शकतात. त्यामुळे, सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत सिंधूचा पहिला सामना सिंगापूरच्या शियाओयू लियांगविरुद्ध होणार होता; परंतु लियांगने स्पर्धेतून माघार घेतल्याने सिंधू पहिल्या सामन्यात पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूविरुद्ध खेळेल. त्याच वेळी सायनाचा पहिला सामना चिनी-तैपेईच्या चिया सिन लीविरुद्ध होईल. पुरुष एकेरीत भारताची मदार के. श्रीकांत, बी. साई प्रणीत, समीर वर्मा आणि एच. एस. प्रणय यांच्यावर असेल. (वृत्तसंस्था)