सायना नेहवाल- पी. व्ही सिंधू सुवर्णपदकासाठी झुंजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:25 AM2018-04-15T04:25:11+5:302018-04-15T04:25:11+5:30
भारतीय बॅडमिंटनच्या ‘पोस्टर गर्ल्स’ पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार आहे. त्यांनी शनिवारी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला.
गोल्ड कोस्ट : भारतीय बॅडमिंटनच्या ‘पोस्टर गर्ल्स’ पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार आहे. त्यांनी शनिवारी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला.
२२ वर्षीय आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू टाचेच्या दुखापतीमुळे मिश्र सांघिक स्पर्धेत खेळू शकली नाही. तिने गतविजेती मिशेल लीचा २१-१८, २१-८ ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायनाने २०१४ ची रौप्यपदक विजेती ख्रिस्टी गिलमोरची झुंज २१-१४, १८-२१, २१-१७ ने मोडून काढली. या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित झाले.
२०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन सायना व २०१४ ची कांस्यपदकविजेती सिंधू यांच्यादरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत झाली होती. त्यात सायनाने बाजी मारली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतने अंतिम फेरी गाठली आहे. त्याने पुरुष एकेरीत २०१० च्या राष्ट्रकुल रौप्यपदकविजेत्या इंग्लंडच्या राजीव ओसेफचा २१-१०, २१-१७ ने पराभव केला. तीनवेळचा आॅलिम्पिक रौप्यपदकविजेता लीग चोंग वेईने दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताच्या एच. एस. प्रणयचा २१-१६, ९-२१, २१-१४ ने पराभव केला. प्रणयला त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत राजीव ओसेफविरुद्ध २१-१७, २३-२५, ९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी, सात्विक रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठली. सात्विक-चिरागने श्रीलंकेच्या सचिन डायस व जी. बुवानेका याचा २१-१८, २१-१० ने पराभव केला.
राष्ट्रकुल स्पर्धेत
पुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठणारी
ही पहिली भारतीय जोडी ठरली.
याव्यतिरिक्त पदक पटकावणारी पहिली भारतीय जोडीही ठरणार आहे. आता त्यांना अंतिम फेरीत रिओ आॅलिम्पिक कांस्पदक विजेत्या इंग्लंडच्या मार्कस एलिस व क्रिस लँगरिज यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला दुहेरीत कांस्यपदकाच्या लढतीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी जोडीने आॅस्ट्रेलियाच्या सेतयाना मापासा व ग्रोनया समरविले जोडीचा २१-१९, २१-१९ ने पराभव केला.