राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणीची बाजी, सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 06:51 AM2018-04-15T06:51:57+5:302018-04-15T06:51:57+5:30
सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल हिने बाजी मारली आहे. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आजच्या सामन्यात सायना नेहवालने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा 21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात सायना नेहवालला पी. व्ही. सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली. दोघींच्या या कामगिरीमुळे सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या खात्यात आली आहेत. त्यामुळे भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 17 रौप्य पदके आली आहेत.
दरम्यान, शनिवारी उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोघींनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. 22 वर्षीय ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू टाचेच्या दुखापतीमुळे मिश्र सांघिक स्पर्धेत खेळू शकली नाही. तिने गतविजेती मिशेल लीचा 21-18, 21-8 ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायना नेहवालने 2014 ची रौप्यपदक विजेती ख्रिस्टी गिलमोरची झुंज 21-14, 18-21, 21-17 ने मोडून काढली. या दोघींनीही अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित झाले होते.
2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन सायना व 2014 ची कांस्यपदकविजेती सिंधू यांच्यादरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत झाली होती. त्यात सायना नेहवालने बाजी मारली होती.