सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 10, 2016 03:44 AM2016-06-10T03:44:17+5:302016-06-10T03:44:17+5:30
भारताच्या स्टार शटलर्सनी आॅस्टे्रलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार आगेकूच करताना अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली
सिडनी : सायना नेहवाल आणि के. श्रीकांत या भारताच्या स्टार शटलर्सनी आॅस्टे्रलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार आगेकूच करताना अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही खेळांडूनी रिओ ओलिम्पिकचे तिकीट मिळविले असून, ही स्पर्धा दोघांसाठी आॅलिम्पिक पूर्वतयारी म्हणून महत्त्वाची आहे.
सायनाने एकतर्फी झालेल्या लढतीत दणदणीत विजय मिळविताना मलेशियाच्या जिन वेई गोहचा ३७ मिनिटांत फडशा पाडला. संपूर्ण लढतीत आक्रमक खेळाच्या जोरावर वर्चस्व राखलेल्या सायनाने वेई गोहला २१-१२, २१-१४ असे लोळविले. उपांत्यपूर्व लढतीत सायनासमोर २०१३ची वर्ल्ड चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित खेळाडू थायलंडच्या रतचानोक इंतानोनचे तगडे आव्हान असेल.
सायनाने ही लढत सहजपणे जिंकली असली, तरी तिची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. वेई गोहने आक्रमक सुरुवात करताना ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. यानंतर ९-७ अशी वेई गोह आघाडीवर राहिली. यानंतर मात्र सायनाने सलग ६ गुणांची वसुली करताना १३-९ ची मजबूत आघाडी घेत सहजपणे पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने चांगली सुरुवात करताना ५-२ अशी आघाडी घेतली. मात्र, वेह गोहने नंतर ९-९ अशी बरोबरी साधल्यानंतर पुन्हा एकदा सायनाने आपला हिसका दाखविताना दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.
दुसरीकडे एप्रिल महिन्यातील व्यस्त कार्यक्रमानंतर घेतलेल्या एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या सोनी ड्वी कुनकोरो याचा ३४ मिनिटांत २१-१९, २१-१२ असा धुव्वा उडविला. पहिल्या गेममध्ये काही प्रमाणात सोनीने झुंज दिली. मात्र, यानंतर श्रीकांतने त्याला स्थिरावण्यास फारशी संधी दिली नाही. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतला कोरियाच्या वांग ही हियोविरुद्ध भिडावे लागेल. (वृत्तसंस्था)
>युवा खेळाडूंचे आव्हान संपुष्टात...
एकीकडे सायना व श्रीकांत आगेकूच करीत असताना दुसरीकडे युवा खेळाडूंचे आव्हान मात्र संपुष्टात आले. तन्वी लाड व समीर वर्मा यांना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेती असलेल्या तन्वीला चीनच्या चौथ्या मानांकित यिहान वैंग विरुद्ध १८-२१, ६-२१ असा पराभव पत्करावा लागला, तर राष्ट्रीय विजेता समीरला इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिनटिंगने ११-२१, २१-७, २१-१९ असे नमविले.