Paris Olympics 2024 : क्रिकेटसारख्या सुविधा द्या, चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकू; सायना नेहवालचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:01 PM2024-08-09T16:01:05+5:302024-08-09T16:02:56+5:30
भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.
saina nehwal olympics 2024 : भारतालापॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. अद्याप भारत सुवर्ण पदकाच्या प्रतीक्षेत आहे. नीरज चोप्रा आपल्या पदकाचा बचाव करून पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करेल असे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानचा अर्शद नदीम त्याला वरचढ ठरल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतात इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटची भलतीच लोकप्रियता आहे. क्रिकेट भारतीयांसाठी जणू काही एक धर्मच... या धर्माचे कोट्यवधी चाहते आहेत. क्रिकेटला भारतीयांना भरभरून प्रेम दिले. यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष झाले अशी चर्चा दबक्या आवाजात होत असते. आता याबद्दल बोलताना भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले पदक जिंकून देणाऱ्या सायना नेहवालने आपली खदखद व्यक्त केली आहे.
२०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पण, भारताला केवळ पाच पदके जिंकता आली आहेत. यामध्ये ४ कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सायना नेहवालने नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली.
सायना नेहवालचा संताप
सायना नेहवालने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या देशात केवळ आणि केवळ क्रिकेटला महत्त्व दिले जाते. अन्य खेळांना सुविधा किंवा आर्थिक मदत केली जात नाही. क्रिकेटपटूंना जे सहकार्य मिळते ते इतर खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी सुधारेल आणि चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकण्यातही भारतीय खेळाडू यशस्वी होतील, असे सायना नेहवालने सांगितले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली.