सायना नेहवाल उपांत्य फेरीत
By admin | Published: April 29, 2016 07:44 PM2016-04-29T19:44:03+5:302016-04-29T19:44:03+5:30
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत चीनच्या वांग शिझियानचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
आशियाई बॅडमिंटन : चीनची वांग शिझियानला अवघ्या ५६ मिनिटांत केले पराभूत
वुहान (चीन) : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत चीनच्या वांग शिझियानचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत आठव्या आणि या स्पर्धेत पाचवे मानांकन असलेल्या सायनाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तिसऱ्या मानांकित वांग शिझियानचा ५६ मिनिटांत २१-१६, २१-१९ गुणांनी पराभव करून अवघड अडथळा पार केला. उपांत्य फेरीत सायनाला सहावी मानांकित चीनच्या वांग यिहान आणि दुसरे मानांकन असलेली जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढावे लागणार आहे. दुखापतीतून बरी झाल्यानंतर पुनरागम केलेल्या सायनाने शुक्रवारी झालेल्या लढतीत नेटजवळ प्लेसिंग आणि काही जोरदार स्मॅश मारून वांग शिझियानला निष्प्रभ केले. सायनाच्या आक्रमक खेळापुढे वांगला काहीच करता आले नाही. पहिल्या गेममध्ये सायनाने सुरुवातीला आघाडी घेतली. नंतर वांगने ४-४ अशी बरोबरी साधली. नंतर सायनाने जोरदार खेळाचे प्रदर्शन करून सलग सात गुण संपादन करून १५-१० अशी आघाडी घेत गेमही जिंकली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला सायनाला पहिल्या गेमसारखा खेळ करता आला नाही. वांगने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सलग ९ गुण मिळवित १५-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने आक्रमक खेळ करीत ५ गुण संपादन केले आणि १७-१७ अशी बरोबरी साधली. दोन्ही खेळाडूंना एक-एक गुणांसाठी संघर्ष करावा लागला आणि सायनाने २१-१९ अशी बाजी मारली.
रियो आॅलिम्पिक कॉलिफिकेशनसाठी या स्पर्धेतील गुणांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. त्यामुळे लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकलेल्या सायनाने वांगविरुध्दच्या विजयात कोणतीच कसर सोडली नाही.
या विजयाने सायनाने पाचव्या मानांकति यांगविरूध्द विक्रमी ७-७ विजयाची बरोबरी केली. या दोन्ही खेळाडू त्यांच्या कारर्किदीतील ही १४ वी लढत होती. सायनाचा वांगविरूध्द २०१४ दुबई सुपर सिरीजनंतर पहिला विजय आहे. गत वर्षी सायनाला इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)