सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत

By admin | Published: April 7, 2016 02:06 AM2016-04-07T02:06:59+5:302016-04-07T02:06:59+5:30

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली भारताची स्टार शटलर सायना नेहवालने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी

Saina, Sindhu in second round | सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत

सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत

Next

शाह आलम : जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली भारताची स्टार शटलर सायना नेहवालने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूनेही विजयी कूच करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पुरुष गटात मात्र भारताला मोठा झटका बसला आहे. ज्यांच्यावर पदकाची मदार होती ते एच. एस. प्रणय आणि
किदांबी श्रीकांत दोघांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा झटका बसला. त्यामुळे पुरुष गटात भारताच्या पदकाच्या अपेक्षाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
स्पर्धेत तिसरे मानांकन असलेल्या सायनाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलचा ३० मिनिटांमध्ये२१-१६, २१-७ असा सहज पाडाव केला. नुकत्याच मागील आठवड्यात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेतही सायनाने जिंदापोलला नमवले होते. जिंदापोल जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असून सायनाने तिच्याविरुद्ध सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये सावध भूमिका घेतलेल्या सायनाने जिंदापोलच्या खेळीचा अंदाज घेतला. या वेळी जिंदापोलने काही उत्कृष्ट फटके मारताना सायनाला लढत देण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र पहिला सेट जिंकल्यानंतर सायनाने फार वेळ न घेता जिंदापोलविरुद्ध तुफानी हल्ला चढवून सहजपणे बाजी मारली. दुसऱ्या फेरीत सायनापुढे बल्गेरियाच्या लिडा जेतचिरी आणि कोरियाच्या बाई यिओन जू यांच्यातील विजेत्या खेळाडूचे आव्हान असेल.
तत्पूर्वी, भारताची अन्य स्टार खेळाडू सिंधूने अपेक्षित विजयी सलामी देताना चीनच्या एच. ई. बिंगजियाओचे कडवे आव्हान ४० मिनिटांत परतवले. सलग दोन सेटमध्ये बाजी मारताना सिंधूने २१-१६, २१-१७ अशा गुणांनी बिंगजियाओला स्पर्धेबाहेर जाण्यास भाग पाडले. जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या बिंगजियाओविरुद्ध सिंधू पहिल्यांदाच खेळत होती. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर सातव्या मानांकीत कोरियाच्या की सूंग जी हियूनचे
तगडे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या हियूनविरुद्ध सिंधूचे करिअर रेकॉर्ड ४-३ असे आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Sindhu in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.