सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 09:27 PM2016-04-27T21:27:42+5:302016-04-27T21:27:42+5:30
रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महिला एकेरीत
एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप : श्रीकांत, ज्वाला-अश्विनी जोडी पराभूत
वुहान (चीन) : रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महिला एकेरीत अनुक्रमे फित्रीयानी फित्रीयानी व मारिया फेबे कुसुमास्तुतीचा पराभव करून आपले विजयी अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पुरुष एकेरीत के. श्रीकांत, तर महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला पराभव पत्करावा लागला. सायना व सिंधूच्या विजया व्यतिरीक्त भारतीय खेळाडूंसाठी पहिला दिवस निराशाजनक ठरला.
पाचवी मानांकित सायनाने पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या फित्रीयानी फित्रीयानीचा २१-१६, २१-१७ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत सायनाची लढत इंडोनेशियाच्या लिंहावेनी फानेत्री आणि थायलंडची नितचानोन जिंदापोल यांच्यातील विजेतीविरुद्ध होईल. पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमास्तुतीला अर्ध्या तासात २१-१०, २१-१३ गुणांनी नमवित बाहेरचा रस्ता दाखविला. सिंधूची पुढच्या फेरीत चीनी तैपईचर आठवी मानांकित ताई जु यिंगविरुद्ध होणार आहे.
दुसरीकडे भारताची अव्वल महिला दुहेरीची ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पाला कोरियाच्या चांग ये ना आणि ली सो ही या जोडीकडून १५-२१, ११-१२ असा सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पुणुष दुहेरीत मनु अत्री व बी सुमीत रेड्डी या जोडीला जापानच्या हिरोयुकी इंडो व केनिची हायाकावा या जोडीकडून १५-२१, १३-२१ पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या दुसऱ्या दुहेरीत प्रणव चोपडा व अक्षय देवलकर जोडीला हॉँगकॉँगच्या चिन चुंग व टांग चुनमान कडून १९-२१, १७-२१ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. आठवा मानांकित श्रीकांतला बिगर मानांकित कोरियाच्या ली डोंग कियूनकडून १ तास १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१३, १२-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)