सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत

By admin | Published: June 11, 2016 06:18 AM2016-06-11T06:18:20+5:302016-06-11T06:18:20+5:30

सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅस्ट्रेलियान ओपन बॅडमिंटनची उपांत्य फेरी गाठली.

Saina, Srikanth in semis | सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत

सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत

Next

 

सिडनी : भारताची आॅलिम्पिक पदकाची आशा असलेली सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅस्ट्रेलियान ओपन बॅडमिंटनची उपांत्य फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांत याने देखील सरळ गेममध्ये शानदार विजयाची नोंद करीत एक पाऊल पुढे टाकले आहे.
सातवी मानांकित सायनाने जुनी पारंपरिक प्रतिस्पर्धी थायलंडची रत्वानोक इंतानोन हिच्यावर ५६ मिनिटांत २८-२६, २१-१६ असा विजय नोंदवित सरशी साधली. बिगर मानांकित श्रीकांतने कोरियाचा वांग ही याच्यावर उपांत्यपूर्व लढतीत ३६ मिनिटांत २१-१८, २१-१७ ने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने इंतानोनविरुद्ध कारकिर्दीत १२ पैकी हा सातवा विजय साजरा केला. उबेर चषक स्पर्धेत इंतानोनकडून झालेल्या पराभवाची परतफेडदेखील सायनाने केली आहे. सायनाच्या या विजयातून रिओ आॅलिम्पिकसाठी ती पूर्णपणे फिट असल्याचे संकेतही मिळाले. २०१६ मध्ये सायना एकही अंतिम सामना खेळली नाही. सायनाला इंतानोनविरुद्ध पहिला गेम जिंकण्यासाठी फारच परिश्रम घ्यावे लागले. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडू एकेक गुण मिळविण्यासाठी अक्षरश: झुंजल्या. सायनाकडे एकवेळ १५-१२, १८-१५ अशी आघाडीही होती पण २६ गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंदरम्यान चढाओढ गाजली. दोघींनीही अनेक गेम गुण गमविले. इंतानोन तर २६-२५ अशी आघाडीवर देखील गेली होती. पण सायनाने सलग तीन गुणांची कमाई करीत पहिला गेम २८-२६ असा जिंकला.
गेम जिंकताच सायनाने इंतानोनवर मानसिक दडपण आणले. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ११-७ अशी आघाडी घेताच मागे वळून बघितलेच नाही. सलग सहा गुण मिळवित तिने आघाडी १७-८ अशी केली. नंतर २१-१६ ने गेम आणि सामना जिंकला. आता सायनाला आव्हान असेल ती चौथी मानांकित चीनची खेळाडू वांग यिहान हिचे. पुरुष गटात श्रीकांतने धडाका सुरू ठेवत कोरियाचा वांग याला २१-१८, २१-१७ ने विजय नोंदविला. उपांत्य फेरीत श्रीकांतला डेन्मार्कचा हेन्स ख्रिस्टियन याचे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Srikanth in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.