सायना, श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक आशा जवळपास संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:44 AM2021-05-13T07:44:54+5:302021-05-13T07:46:02+5:30
एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती.
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा फटका सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेला बसला असून ही स्पर्धा आता रद्द करण्यात आली आहे. मात्र याचा मोठा परिणाम भारताला भोगावा लागणार असून यामुळे आता सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत या अव्वल भारतीयांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती. बीडब्ल्यूएफने सांगितले की, ‘सर्व खेळाडू, स्पर्धा कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून ही स्पर्धा रद्द केली आहे.’ स्पर्धेच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचेही बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले. त्याचवेळी ऑलिम्पिक पात्रतेविषयी पुढे सांगण्यात येईल, असेही बीडब्ल्यूएफने सांगितले.
सायना, श्रीकांतसाठी निराशा
सिंगापूर ओपन स्पर्धा सायना व श्रीकांतसाठी महत्त्वाची होती. कारण या स्पर्धेतूनच त्यांचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित होणार होता. याआधी सात मे रोजी मलेशिया ओपन स्पर्धाही स्थगित झाली होती. त्यामुळे ऑलिम्पिक प्रवेशाचे सर्व गणित सिंगापूर ओपन स्पर्धेवर निर्भर झाले होते.