सायनाचे सुवर्ण हुकले

By admin | Published: August 16, 2015 10:48 PM2015-08-16T22:48:34+5:302015-08-16T22:48:34+5:30

बॅडमिंटनमध्ये विश्व चॅम्पियन होणारी पहिली भारतीय ठरण्याचे सायना नेहवालचे स्वप्न आज भंगले. अंतिम लढतीत सायनाला गत चॅम्पियन स्पेनच्या कॅरालिना मारिनविरुद्ध

Saina's gold hook | सायनाचे सुवर्ण हुकले

सायनाचे सुवर्ण हुकले

Next

जकार्ता : बॅडमिंटनमध्ये विश्व चॅम्पियन होणारी पहिली भारतीय ठरण्याचे सायना नेहवालचे स्वप्न आज भंगले. अंतिम लढतीत सायनाला गत चॅम्पियन स्पेनच्या कॅरालिना मारिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय खेळाडूला परंपरागत प्रतिस्पर्धी व अव्वल मानांकित खेळाडूविरुद्ध ५९ मिनिटांमध्ये १६-२१, १९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. सायनाला सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाला विश्व चॅम्पियनशिपमध्ये अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. सायनाला यंदाच्या मोसमात आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मारिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे. यापूर्वी पी. व्ही. सिंधूने २०१३ व २०१४ मध्ये कास्यपदक पटकावले होते, तर ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीमध्ये २०११ मध्ये कास्यपदकाचा मान मिळवला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतातर्फे पहिले पदक १९८३ मध्ये दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पटकावले होते. ते कास्यपदकाचे मानकरी ठरले होते.
स्पेनच्या मारिनविरुद्ध सायनाने गेल्या चारपैकी तीन लढतींमध्ये विजय मिळवला होता व एक लढत गमावली होती. त्यामुळे कागदावर सायनाला विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जात होते. आॅल इंग्लंड फायनलमध्ये सायनाचा पराभव करणाऱ्या मारिनने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.
मारिन प्रत्येक गुण वसूल केल्यानंतर जल्लोष करीत होती. त्यामुळे चेअर अंपायरने तिला समज दिली. रॅकेटचा आदर करीत नसल्यामुळे तिला ताकीदही देण्यात आली. पहिल्या गेममध्ये ७-७ च्या बरोबरीनंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूने आघाडी कायम राखत पहिला गेम जिंकला. पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत मारिनने ११-८ अशी आघाडी घेतली होती. सायनाने केलेल्या चुकांचा लाभ घेत मारिनने १५-९ अशी आघाडी वाढवली. त्यानंतर मारिनने १३-२० ची आघाडी घेतली. सायनाने काही गुण वसूल करीत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण एक फटका बाहेर गेल्यामुळे स्पेनच्या खेळाडूने गेम जिंकत १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने संघर्षपूर्ण खेळ करीत मारिनने केलल्या चुकांचा लाभ घेतला. मध्यंतराला भारतीय खेळाडूने ११-६ अशी आघाडी घेतली होती. मारिनने संघर्षपूर्ण खेळ करीत सलग सहा गुण वसूल केले आणि १२-१२ अशी बरोबरी साधली. मारिनने वेगवान खेळ करीत सायनाला झुंजवले आणि शरीरवेधी फटके खेळले.
सायनाने रॅली खेळत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मारिनने १७-१७ अशी बरोबरी साधल्यानंतर मोक्याच्या क्षणी वर्चस्व गाजवले आणि २०-१८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मारिनने एक गुण गमावला, पण दुसरा गुण वसूल करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर मारिनने कोर्टवर जल्लोष केला, तर सुवर्णपदक पटकावण्याची संधी गमावणारी सायना खिन्न मनाने कोर्टच्या बाहेर पडली.

पहिल्या गेममध्ये अनेक चुका केल्या
मी पहिल्या गेममध्ये अनेक चुका केल्या. त्यामुळे विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भंगले. ‘आज मी सर्वोत्तम खेळ केला नाही. मी यापेक्षा चांगली कामगिरी करू शकते. दुसऱ्या गेममध्ये माझ्याकडे आघाडी होती; पण प्रतिस्पर्धी खेळाडूने लवकरच बरोबरी साधली. या चार-पाच गुणांच्या फरकादरम्यान मला धैर्य दाखविता आले नाही. फिटनेसबाबत कुठलीच अडचण नाही. फायनलमध्ये शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या परिपक्व असणे महत्त्वाचे असते. दुसऱ्या गेममध्ये मोक्याच्या क्षणी मी टाळण्याजोग्या चुका केल्या. दुसऱ्या गेममध्ये मी रॅली खेळण्याचा प्रयत्न केला; पण स्कोअर वेगाने वाढला.’ ‘अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव मारिनसाठी उपयुक्त ठरला. विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव असला म्हणजे तुमच्यासाठी सर्व काही सहज होते. ती जय-पराजयाचे दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करीत होती. मी गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी समाधानी आहे.
- सायना नेहवाल

सायनाची एकाग्रता भंग झाली होती
वडील हरवीर यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : प्रथमच विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या दडपणाखाली सायनाला एकाग्रता कायम राखता आली नाही आणि त्यामुळेच तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, अशी प्रतिक्रिया सायनाचे वडील हरवीर यांनी व्यक्त केली.
हरवीर म्हणाले, ‘हा मानसिक दडपणाचा भाग आहे. कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे, या विचारामुळे तिच्यावर दडपण आले आणि त्यामुळे तिची एकाग्रत भंग झाली.’
सायनाने रौप्यपदक पटकावल्यामुळे समाधान झाले; पण जेतेपदाचा मान मिळवला असता तर अधिक आनंद झाला असता. सायनाने सर्वोत्तम प्रयत्न केला, पण मारिन अधिक मजबूत होती. सायनामध्ये अद्याप बरेच बॅडमिंटन शिल्लक असून ती दमदार पुनरागमन करेल. फिटनेसवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

(वृत्तसंस्था)

Web Title: Saina's gold hook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.