‘पद्मभूषण’साठी सायनाची शिफारस
By admin | Published: January 6, 2015 01:37 AM2015-01-06T01:37:32+5:302015-01-06T08:55:47+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनटपटू सायना नेहवाल हिची अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़
क्रीडा मंत्रालयाचा निर्णय : पुरस्कारासाठी वेळेत शिफारस केल्याचे बॅडमिंटन महासंघाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनटपटू सायना नेहवाल हिची अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे़ हा मानाचा पुरस्कार न मिळाल्याने सायनाने जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती़ यानंतर क्रीडा मंत्रालयाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे़ दरम्यान, भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) या पुरस्कारासाठी वेळेत अर्ज दाखल केला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे़
पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने दोन वेळा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याच्या नावाची शिफारस केली होती़ यानंतर या पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस न केल्याबद्दल सायनाने तीव्र नाराजी व्यक्त केली़ पुरस्काराबद्दलचा वाद वाढत चालल्याने अखेर मंत्रालयाने आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला़
पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस झाल्यामुळे सायना नेहवाल हिने आनंद व्यक्त केला आहे़ ती म्हणाली, की केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने एवढ्या लवकर दखल घेत पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केला, याचा आनंद आहे़ याबद्दल तिने केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांचे विशेष आभार मानले़
याबद्दल क्रीडा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले, की १ मे २०१४ रोजी गृहमंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी अर्ज मागितले होते़ या पुरस्कारासाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १५ सप्टेंबर होती़ मात्र, भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) सायनाच्या नावाची शिफारस ३ जानेवारी रोजी केली होती़ त्यामुळे यापूर्वी तिच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता; मात्र आता मंत्रालयाने उशिरा का होईना गृहमंत्रालयाला सायनाच्या नावाची शिफारस केली आहे़
बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष अशिलेख दासगुप्ता म्हणाले, की आम्ही आॅगस्ट २०१४ मध्येच सायना नेहवाल हिच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली होती; मात्र याचे पत्र क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांच्याकडे उशिरा पोहोचले, यासाठी आम्ही जबाबदार नाही़ क्रीडा मंत्रालयाला पत्राची मूळ प्रत न पोहोचल्यामुळे आम्ही पुन्हा या पत्राची दुसरी प्रत पाठविली, असेही दासगुप्ता यांनी सांगितले़ दरम्यान, बॅडमिंटन महासंघाकडून आम्हाला कोणतेही पत्र मिळाले नाही़ त्यामुळे सायनाच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी गृहमंत्रालयाकडे शिफारस करण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले़ (वृत्तसंस्था)
सायनाचे माध्यमांवर ताशेरे
च्जागतिक मानांकनात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवाल हिने माध्यमांवर ताशेरे ओढले़
च्ती म्हणाली, की ज्या प्रकारे या पुरस्काराबद्दलचे वृत्त मीडियात दाखविण्यात आले याचे दु:ख आहे़ कारण हा पुरस्कार मला मिळावा, यासाठी मी मागणीच केली नव्हती़ मी केवळ नावाची शिफारस केली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली होती़ हा पुरस्कार मला देण्यात यावा, असे मी कधीच म्हटले नव्हते़
सुशील कुमारकडून सायनाला शुभेच्छा
च्नवी दिल्ली : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने शिफारस केल्यामुळे भारताचा स्टार मल्ल सुशील कुमार याने सायनाचे अभिनंदन केले आहे़
च्तो म्हणाला, की केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी सायनाच्या नावाची शिफारस केली, याचा आनंद आहे़ ज्या प्रकारे तिने बॅडमिंटनमध्ये देशाचा गौरव वाढविला आहे, त्याबद्दल ती या पुरस्कारासाठी पात्र उमेदवार आहे़