पद्मभूषण पुरस्कारासाठी सायनाची शिफारस, पण संभ्रम कायम
By admin | Published: January 5, 2015 04:08 PM2015-01-05T16:08:23+5:302015-01-05T16:18:10+5:30
क्रीडा मंत्रालयाने पद्मभूषण पुरस्कारासाठी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नावाची शिफारस केली असली तरी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - क्रीडा मंत्रालयाने सोमवारी पद्मभूषण पुरस्कारासाठी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले असून सायनाला यंदा पद्मभूषण पुरस्कार मिळणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
पद्मभूषण पुरस्कार न मिळाल्याने सायना नेहवालने दोन दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे ती मी देखील पूर्ण करते. सुशील कुमार ही अट पूर्ण करीत असेल आणि पुरस्कारसाठी पात्र भरत असेल, तर मी का नाही, असा सवाल करीत तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली होती. सायनाने उघडपणे व्यथा मांडल्यावर क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती. सोमवारी क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली आहे. शनिवारी आम्हाला भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून सायनाच्या नावाची शिफारस आली असून सायनाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहता तिची शिफारस गृहमंत्रालयकडे पाठवली आहे असे क्रीडा मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
शिफारस झाली पण तिढा कायम
गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी १ मे रोजी परिपत्रक काढून पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारशी मागवल्या होत्या. पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख १५ सप्टेंबर २०१४ होती. हे परिपत्रक आम्ही सर्व क्रीडा महासंघांना पाठवले होते आणि २० ऑगस्टपर्यंत महासंघांनी त्यांच्या खेळाडूंची व प्रशिक्षकांची नावे आम्हाला पाठवावीत अशी सूचनाही केली होती असा दावा क्रीडा मंत्रालयाने केला आहे. मात्र बॅडमिंटन महासंघाने दिलेल्या मुदतीमध्ये सायनाचे नाव पाठवलेच नाही असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. आता ही मुदत उलटून चार महिन्यांचा कालावधी लोटल्याने गृह मंत्रालय ही शिफारस स्वीकारेल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.