सायनाची विजयी सलामी
By admin | Published: October 14, 2015 11:54 PM2015-10-14T23:54:18+5:302015-10-14T23:54:18+5:30
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल हिने ६ लाख ५० हजार डॉलर बक्षिसांच्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या
ओंडेसे : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल हिने ६ लाख ५० हजार डॉलर बक्षिसांच्या डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत थायलंडची बुसानन ओंगबुमरंगफान हिच्यावर मात करीत विजयी सलामी दिली. तीन वर्षांआधी येथे विजेतेपद पटकविणाऱ्या सायनाने जपान ओपनमध्येदेखील बुसाननला नमविले होते.
एक तास नऊ मिनिटे चाललेल्या या संघर्षात सायनाने २३-२१, १४-२१, २१-१८ अशा फरकाने विजय साजरा केला. पुढील फेरीत सायनाला जपानची मिनात्सु मितानी आणि थायलंडची पोर्नतिप यांच्यातील विजेतीविरुद्ध खेळावे लागेल. बुसानने सुरुवातीला ८-४ अशी आघाडी मिळविली होती; पण सायनाने मुसंडी मारून ९-९ अशी बरोबरी साधली. प्रतिस्पर्धी खेळाडूने पुन्हा एकदा २०-१८ अशी आघाडी मिळविली. सायनाने मात्र सलग तीन गुणांची कमाई करीत गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये बुसानने ७-४ अशी आघाडी घेतली. सायनाने या गेममध्येही मुसंडी मारण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण थायलंडच्या खेळाडूने पकड घट्ट करीत गेम जिंकताच लढत बरोबरीत आली होती. निर्णायक गेममध्ये सायनाने ६-२ अशी आघाडी मिळविल्यानंतरही बुसानने ६-६ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यानंतरही सामना बरोबरीत सुरूच होता. एकवेळ ११-११ असा गुणफलक होता. बे्रकनंतर सायनाने १३-१२ अशी आघाडी घेतली व ती १८-१२ वर नेली. थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने परतण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले; पण सायनाच्या आक्रमकतेपुढे तिची डाळ न शिजल्याने सायनाने गेम आणि सामना खेचून नेला.(वृत्तसंस्था)