"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:46 PM2024-11-07T13:46:43+5:302024-11-07T13:47:44+5:30
Sakshi Malik : उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे.
नवी दिल्ली : कुस्तीचे भवितव्य वाचवा, असे आवाहन महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना केले आहे. यासंदर्भात साक्षी मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात साक्षी मलिकने भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. साक्षी मलिकने व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधित करताना म्हटले आहे की, कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्रिजभूषण यांचा 'मूर्खपणा' आणि दबदबा तुम्ही आणि संपूर्ण जगाने पाहिला. ज्यामुळे मला अत्यंत अस्वस्थ मनाने कुस्ती सोडावी लागली. पण यामुळे फारसा फरक पडला नाही.
काही दिवसांनी फेडरेशनने पुन्हा आपले काम सुरू केले. मात्र, या मुद्द्यावर उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे. पुढे साक्षी मलिक म्हणाली, "मी या उत्तर रेल्वेमध्ये मुलांची भरती पाहत आहे. अशा स्थितीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून सातत्याने धमक्या येत आहेत की, मला या भरतींमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवले जाईल. मला अशा धमक्यांची फारशी पर्वा नाही, पण कुस्तीचे भवितव्य अशा लोकांच्या हातात आहे,जे ते खराब करत आहेत, याचे वाईट वाटत आहे. माझी तुम्हाला (पीएम मोदी) विनंती आहे की आमची कुस्ती वाचवा."
याचबरोबर कुस्ती फेडरेशन रद्द झाल्यानंतरही काम करत असल्याबद्दल साक्षी मलिक म्हणाली की, सरकारने रद्द केलेल्या फेडरेशनला हायकोर्टाने फटकारले होते आणि काम सुरू ठेवण्यासाठी त्यांचे उपक्रम थांबवले होते, परंतु तरीही त्यांचे काम थांबलेले नाही. हायकोर्टाने जेव्हा पुन्हा हस्तक्षेप केला. तेव्हा त्यांनी मुलांना पुढे केले.साक्षी मलिक म्हणाली, "मी त्या मुलांची मजबुरी समजू शकते, त्यांचे संपूर्ण करिअर त्यांच्या पुढे आहे. आणि हे करिअर अशा फेडरेशनच्या हातात आहे. सर, माझी तुम्हाला विनंती आहे की, जर तुम्हाला ब्रिजभूषण यांचे वर्चस्व असलेल्या फेडरेशनमध्ये मुलींचे भविष्य सुरक्षित आहे, असे वाटत असेल तर तुम्ही फेडरेशनवरील स्थगिती उठवावी आणि जर तुम्हाला वाटत नसेल तर कायमस्वरूपी उपायाचा विचार करावा."