साळगावकरचा ‘शिलाँग’ला झटका!
By admin | Published: December 31, 2014 11:44 PM2014-12-31T23:44:18+5:302014-12-31T23:44:18+5:30
बिकास जयरु आणि गुरजिंदर कुमारने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या साळगावकर स्पोटर््स क्लबने शिलाँग लॉजाँगचा २-१ ने पराभव केला.
पणजी : बिकास जयरु आणि गुरजिंदर कुमारने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या साळगावकर स्पोटर््स क्लबने शिलाँग लॉजाँगचा २-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात तीन गुण मिळवले. जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर गुरिंदर कुमार हा ‘सामनावीर’ ठरला. शिलाँगचा एकमेव गोल इन्जुरी वेळेत जॅकब लालरांगबावला याने नोंदवला.
वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या या सामन्यात साळगावकरने शिलॉँगवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. त्यांना पाच गोल संधी मिळाल्या होत्या. तर शिलाँग लॉजॉँगला केवळ एकच संधी प्राप्त झाली होती. या सत्राच्या १३ व्या मिनिटाला डॅरल टफीचा जोरकस फटका किंचित गोल पोष्टाबाहेरून गेला आणि ही संधी हुकली. त्यानंतर ३१ व्या मिनिटाला थॉमजंग सिंगचा ३० यार्डवरील जोरकस फटका आडव्या बारला लागून बाहेर गेला. ४३ व्या मिनिटाला शिलाँगच्या आयबर खोनजीयेने साळगावकरच्या डॅरल टफीला डि क्षेत्राबाहेर पाडले त्यामुळे फ्रिकीक देण्यात आली. मात्र, याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. अखेर पहिले सत्र गोलशून्य असे राहिले.
दुसऱ्या सत्रात साळगावकरचाच दबदबा दिसून आला. या वेळीसुद्धा त्यांनी पाच संंधी मिळवल्या. ५८ व्या मिनिटाला डॅरेल टफीने दिलेल्या पासवर बिकास जयरूने चेंडूला जाळीची दिशा दाखवीत साळगावकरचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ६७ व्या मिनिटाला साळगावकरने दुसरा गोल नोंदवित आघाडी २-0 वर नेली. या वेळी थॉमजंग सिंगच्या कॉर्नर किकवर गुरजिंदर कुमारने हेडरद्वारे हा गोल नोंदवला. दुसरीकडे, ९३ व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळ) जॉकाब लालरावंगबवालने साळगावकरचा गोलरक्षक अभिजितला गुंगारा देत चेंडूला जाळीत टाकले व ही आघाडी २-१ अशी कमी केली. (क्रीडा प्रतिनिधी)