औरंगाबादच्या संभाजीचा डबल गोल्डन धमाका
By admin | Published: September 19, 2016 04:05 AM2016-09-19T04:05:52+5:302016-09-19T04:05:52+5:30
-पाटील याने इतिहास रचताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला.
गबाला : औरंगाबादचा उदयोन्मुख १७ वर्षीय नेमबाज संभाजी शिवाजी झनझन-पाटील याने इतिहास रचताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला. त्याच्या या शानदार कामगिरीने भारतानेदेखील पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.
अजरबेजानच्या गबाला येथे सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत औरंगाबादच्या संभाजी पाटील याने ज्युनियर पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल स्पर्धेत ५६२ गुणांसह आॅस्ट्रेलियाच्या सरगेई इवग्लेस्की आणि जेम्स एशमोर यांना मागे टाकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. सरगेईने रौप्य आणि जेम्स एश्मोर याने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर संभाजी पाटील याने आपल्या या देदीप्यमान कामगिरीत सातत्य राखताना भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देताना भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. संभाजीने
सांघिक सुवर्ण गुरमीत आणि रितुराजसिंह यांच्यासाथीने देशाला जिंकून दिले. त्याआधी बंगालच्या शुभंकर प्रामाणिक याने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने हे सोनेरी यश ५0 मीटर रायफल प्रो प्रकारात २0 शॉटसह एकूण २0५.५ गुणांसह मिळवले. झेक प्रजासत्ताकच्या फिलीप नेपेजचलने २0५.२ गुणांसह रौप्य आणि रोमानियाच्या ड्रेगोमिर ईरोदाके याने १८१.१ गुणांसह कांस्यपदक आपल्या नावावर केले. शुभंकरने सांघिक गटात फत्तेसिंह ढिल्लो व अजय नितीश याच्या साथीने भारताला सांघिक रौप्यपदकदेखील जिंकून दिले. याशिवाय भारतीय नेमबाजांनी ज्युनियर पुरुष संघ रायफल प्रोमध्ये रौप्य आणि दोन कांस्यपदकाची देखील कमाई केली. गतवर्षी जर्मनीत झालेल्या पहिल्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले होते.
>‘संभाजीसाठी नेमबाजी जीव की प्राण’
अवघ्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठित अशा विश्वचषक नेमबाजीसारख्या स्पर्धेसाठी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देण्याची संभाजीची कामगिरी ही वडील म्हणून माझ्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत संभाजीने ५५ पदके जिंकली आहेत. नेमबाजी हा त्याच्यासाठी जीव की प्राण आहे. नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठीदेखील तो कधीही जात नाही. नेमबाजी हा त्याच्यासाठी श्वास बनला आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया संभाजी पाटीलचे वडील शिवाजी झनझन-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शिवाजी झनझन-पाटील हे मनपात मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत.