तोच थरार, तीच खुन्नस पुन्हा मैदानात
By admin | Published: December 26, 2014 01:57 AM2014-12-26T01:57:22+5:302014-12-26T01:57:22+5:30
मुंबई क्रिकेटचा एक काळ गाजवलेल्या दादर युनियन आणि शिवाजी पार्क या दादा संघांमधील तोच थरार आणि तीच खुन्नस गुरुवारी पुन्हा
मुंबई : मुंबई क्रिकेटचा एक काळ गाजवलेल्या दादर युनियन आणि शिवाजी पार्क या दादा संघांमधील तोच थरार आणि तीच खुन्नस गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईकरांना पाहायला मिळाली; आणि यास निमित्त होते या दोन संघांतील माजी खेळाडूंमध्ये खेळविण्यात आलेला १०-१० षटकांचा विशेष मैत्रीपूर्ण सामना.
दिलीप वेंगसरकर यांच्या पुढाकाराने दडकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात १९७१च्या इंग्लंड दौऱ्यात भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क संघाचे नेतृत्व केले तर दिग्गज वासू परांजपे यांनी दादर युनियनची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे हा मैत्रीपूर्ण सामना असूनही दोन्ही संघांतील खेळाडू त्याच तडफेने आणि विजयाच्या ईर्षेने खेळले.
तसेच या वेळी श्रीधर मांडळे, भरत नाडकर्णी, अवी कर्णिक आणि करसन घावरी यांनीदेखील आकर्षक फटकेबाजी करताना लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी अशोक वाडेकर यांनी आपल्या गोलंदाजीतली धार पुन्हा एकवार दाखवून दिली. यानंतर शिवाजी पार्क संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरत असताना लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी ४-५ षटके पंच म्हणून काम केले. त्याचवेळी उशिराने आलेला संजय मांजरेकरही आपल्या संघाला प्रोत्साहन देताना दिसला. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी सारे खेळाडू सव्वानऊपासूनच हजर होते. मुंबई क्रिकेटला पुन्हा एकदा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर या दोन दादा संघांना पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटवर वर्चस्व गाजवावे लागेल, अशी प्रतिक्रिया साऱ्याच माजी खेळाडूंनी व्यक्त केली.
सामन्यानंतर माटुंगा जिमखान्यावर आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये पॅडी शिवलकर, संजय मांजरेकर, श्रीधर मांडळे व अखेर सुनील गावसकर यांनी सुरेल गाण्यांची मैफल भरवली. (क्रीडा प्रतिनिधी)